Top News

‘प्रदूषणमुक्त पंचगंगा हेच आमचे टार्गेट’; पोलीस बळाचा वापर झाल्यास प्राणांतिक उपोषण : आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमूंगे



हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क  : 

पंचगंगा नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आणखी तीव्र करण्याचा इशारा देत आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमूंगे यांनी, लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनावर पोलीस बळाचा वापर झाल्यास त्याच ठिकाणी प्राणांतिक उपोषणास बसणार असल्याचा इशारा दिला आहे.

यावेळी बोलताना चुडमूंगे म्हणाले की, इचलकरंजीतील काही प्रोसेस उद्योगांकडून पंचगंगा नदीत रासायनिक पाणी सोडले जात असून त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. प्रदूषित पाणी सोडण्यासाठी जवळची पंचगंगा नदी आणि पिण्याच्या पाण्यासाठी लांबची कृष्णा नदी असा इचलकरंजीतील काही घटकांचा दृष्टिकोन अन्यायकारक असून पंचगंगा काठावरील नागरिकांवर तो अन्याय करणारा असल्याचा आरोप त्यांनी केला.

प्रोसेस उद्योगांना रासायनिक पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक जमीन उपलब्ध नसताना त्यांना सुरू ठेवणे हे कायद्याचे उल्लंघन असल्याचा आरोप चुडमूंगे यांनी केला. प्रदूषण नियंत्रण मंडळाने सीईटीपीला (CETP) लावलेले सील तोडण्यात आले होते. ही बाब संबंधित यंत्रणांच्या निदर्शनास येऊनही संबंधित उद्योगांवर कारवाई झाली नाही. त्यामुळेच आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

इचलकरंजीतील उद्योगांनी कायद्याचे पालन करून व्यवसाय करावा, याला आमचा विरोध नाही. मात्र कायदा धाब्यावर बसवून पंचगंगा नदीत रासायनिक सांडपाणी सोडून हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात घातले जात असेल, तर पंचगंगा नदी आणि नदीकाठावरील जनतेच्या संरक्षणासाठी संघर्ष करणे भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त व्हावी यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला इचलकरंजीतील नागरिकांनीही पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. भविष्यात शहराला स्वच्छ आणि मुबलक पिण्याचे पाणी मिळवायचे असेल, तर पंचगंगा नदीचे संवर्धन आणि प्रदूषणमुक्ती अपरिहार्य असल्याचे त्यांनी नमूद केले.

कायद्यापेक्षा कोणीही मोठे नसल्याचे सांगितले जाते; मात्र इचलकरंजीतील काही प्रोसेस उद्योगांच्या बाबतीत वेगळे चित्र दिसत असल्याचा आरोप चुडमूंगे यांनी केला. पैशाच्या जोरावर काही उद्योगांनी प्रशासकीय यंत्रणेवर प्रभाव निर्माण केला असून त्यामुळे प्रदूषणासंदर्भातील गंभीर तक्रारी असूनही कठोर कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी सुरू असलेला हा लढा कोणत्याही परिस्थितीत मागे घेतला जाणार नसून, न्यायासाठी सुरू असलेल्या आंदोलनावर दडपशाही झाल्यास प्राणांतिक उपोषणाचा मार्ग स्वीकारला जाईल, असा स्पष्ट इशारा आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमूंगे यांनी दिला आहे.

थोडे नवीन जरा जुने