Top News

राँग साईडने आलेल्या दुचाकीची धडक; पती, पत्नी व मुलगी जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

 सांगली-कोल्हापूर महामार्गावर चिपरी गावच्या हद्दीत राँग साईडने भरधाव वेगात आलेल्या अज्ञात दुचाकीस्वाराने समोरून धडक दिल्याने पती, पत्नी व मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना २४ मे रोजी दुपारी घडली. याप्रकरणी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात अज्ञात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दादासो मोहन खाडे (वय ३३, सध्या रा. अवधूतनगर, शहापूर, इचलकरंजी) हे त्यांच्या ताब्यातील हिरो स्प्लेंडर प्लस (एमएच ०२ जीए ७०७३) या दुचाकीवरून पत्नी मनिषा खाडे (वय २४), मुलगी सायली खाडे (वय ८) व समृद्धी खाडे (वय ६) यांच्यासह सांगलीहून इचलकरंजीकडे जात होते.

श्रवणबाळ विकलांग वसतीगृहासमोर, चिपरी हद्दीत आल्यानंतर समोरून येणाऱ्या एका कारला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अज्ञात दुचाकीस्वार भरधाव वेगाने व निष्काळजीपणे राँग साईडला आला. त्याने खाडे यांच्या दुचाकीला उजव्या बाजूने जोरदार धडक दिली. या अपघातात दादासो खाडे, त्यांची पत्नी मनिषा आणि मुलगी सायली हे जखमी झाले.

अपघातानंतर संबंधित अज्ञात दुचाकी चालक घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी दादासो खाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जयसिंगपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस हेड कॉन्स्टेबल महापुरे यांनी गुन्हा नोंद केला असून सहाय्यक फौजदार सरनाईक अधिक तपास करीत आहेत.

थोडे नवीन जरा जुने