Top News

पंचगंगेतील जलपर्णीचा कृष्णेत गौरवाडपर्यंत शिरकाव

 गौरवाडात मासे झाले मृत ; कृष्णाकाठावर धोक्याची घंटा

 अनिल जासुद / शिवार न्यूज नेटवर्क :

कुरुंदवाड - नृसिंहवाडी दरम्यान कृष्णा - पंचगंगा नदीचा संगम घाट परिसर पंचगंगेतील जलपर्णीने वेढला गेला आहे. कृष्णा नदीच्या प्रवाहामुळे व वार्‍याच्या दाबामुळे पंचगंगेतील ही जलपर्णी आता नृसिंहवाडी श्री दत्त मंदिरासमोर उलट्या दिशेने कृष्णा नदी च्या दोन्ही काठावरुन मोठ्या प्रमाणात कृष्णेत शिरकाव केली आहे.

 नृसिंहवाडी श्री दत्त मंदिरापर्यंत पसरणारी ही जलपर्णी आता वार्‍याच्या वेगामुळे उलटी वाहत वाहत औरवाड पार करुन गौरवाडपर्यंत आली आहे. व अजुनही ती पुढे पुढे सरकत कवठेगुलंद,शेडशाळच्या दिशेने वाहत आहे. यामुळे कृष्णा नदीचे पाणीही प्रदुषित होत आहे.तर जलपर्णीमुळे गौरवाड पाणवठ्याजवळ काही मासेही मृत होवु लागले आहेत.

 पंचगंगेबरोबरच कृष्णेतही जलपर्णीचा विस्तार होवु लागल्याने कृष्णाकाठावरील गावासाठी ही धोक्याची घंटा आहे.

 इचलकरंजीसह शिरोळ तालुक्यात पंचगंगा नदी पुर्णपणे जलपर्णीने वेढली गेली आहे.या जलपर्णीमुळे पंचगंगेचे पाणी प्रदुषित झाले आहे.यास कारणीभुत असलेल्या विविध घटकावर कार्यवाही करण्यासाठी आंदोलन अंकुश,विविध सामाजिक संघटना तीव्र आंदोलने करीत आहेत.यास पंचगंगानदीकाठावरील अकरा गावेही साथ देत आहेत.या आंदोलनाला आता कृष्णाकाठावरील ग्रामस्थानीही साथ दिली पाहीजे.अन्यथा पंचगंगा नदीची आताची जी परिस्थिती आहे तशी कृष्णा नदीचीही होण्यास वेळ लागणार नाही.

पंचगंगेतील जलपर्णी कृष्णा नदीच्या दोन्ही काठावर पसरली होती.काही दिवसापुर्वी कृष्णेची पातळी खालावल्यामुळे जलपर्णी काठावरच राहील्यामुळे पुर्णपणे सुकुन गेली होती.गेले दोन दिवस कृष्णेच्या पाणी पातळीत हळुहळु वाढ होत आहे.यामुळे नदीकाठावर वाळलेली जलपर्णी वाढत्या पाण्याच्या आवाक्यात येत आहे.पाण्याच्या स्पर्शामुळे सुकलेली,जळलेली जलपर्णी पुन्हा पुर्नजिवित होत आहे. यामुळे जलपर्णीचा विस्तार आणखी जोरात वाढत आहे.

थोडे नवीन जरा जुने