अनिल जासुद / शिवार न्यूज नेटवर्क :
गौरवाड (ता. शिरोळ) येथील होतकरू खेळाडू कु. सायली सतीश सनबे हिने राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत गावासह शिरोळ तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे. फुलगाव, पुणे येथे झालेल्या या स्पर्धेत सायलीने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत गोल्ड मेडलवर आपले नाव कोरले.
या दमदार कामगिरीमुळे तिची आता ओडिशा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली असून, तिच्या यशामुळे परिसरातून आनंद व्यक्त होत आहे. लहान वयातच जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर सायलीने हे यश संपादन केले आहे.
या यशासाठी तिला आई-वडिलांचे मोलाचे प्रोत्साहन लाभले. तसेच कोगनोळी येथील आयपीएस अकॅडमीचे अनमोल पाटील यांचे मार्गदर्शन लाभले असून, इचलकरंजी येथील प्रकाश निराळे हे तिचे प्रशिक्षक आहेत. त्यांच्या प्रशिक्षणामुळेच सायलीने राज्यस्तरावर चमकदार कामगिरी केली.
कु. सायली ही गौरवाड येथील प्रगतशील शेतकरी आप्पासो सनबे यांची नात आहे. तिच्या या यशामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गावकऱ्यांनीही तिच्या पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
