शाहूवाडी / शिवार न्यूज नेटवर्क :
रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील शाहूवाडी तालुक्यातील निळे गावाजवळ सुरू असलेल्या रस्ते कामाच्या ठिकाणी दरडीवरून तब्बल ३० फूट खाली कोसळून गवा रेडा गंभीर जखमी झाला. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी गव्याला उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविले आहे.
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गाचे चौपदरीकरण व रुंदीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे.निळे गावाजवळ रस्त्यालगत खोल दरड तयार करण्यात आली आहे.रात्री उशिरा गवा रेडा जंगलातून रस्ता पार करत असताना खोलीचा अंदाज न आल्याने तो थेट ३० फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात त्याच्या मणक्याला तसेच पायाला गंभीर दुखापत झाली असून फ्रॅक्चर झाल्याची प्राथमिक माहिती वनविभागाने दिली.घटनेनंतर गवा रेडा कोणतीही हालचाल करू शकत नसल्याने तो रात्रीभर जागेवरच पडून होता. सकाळी स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर वनविभागाला माहिती देण्यात आली. वनकर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रयत्नांनी जखमी गव्याला बाहेर काढून उपचारासाठी कोल्हापूरकडे रवाना केले.दरम्यान, माजी खासदार राजू शेट्टी हे रत्नागिरी दौऱ्यावर जात असताना त्यांनी घटनास्थळी थांबून पाहणी केली.यावेळी त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून जखमी गव्यावर तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ठेकेदारांकडून रस्त्याशेजारी खोल उत्खनन करूनही पुरेसे संरक्षक कठडे उभारण्यात आले नसल्याने ही घटना घडल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे.
