अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून अन्नभाग्य योजनेअंतर्गत बीपीएल व अंत्योदय रेशन कार्डधारकांना मोफत तांदूळ वितरित केला जातो. प्रत्येक बीपीएल लाभार्थ्याला प्रतिमहिना 10 किलो तांदूळ देण्यात येत असून, अंत्योदय कार्डधारकांना कुटुंबाच्या सदस्य संख्येनुसार 25 ते 30 किलोपर्यंत तांदूळ मिळतो. मात्र या मोफत धान्याची बोरगावसह सीमाभागात राजरोस खरेदी-विक्री होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
बोरगाव हे सीमाभागात येत असल्याने काही दलालांकडून घरोघरी जाऊन रेशन तांदूळ खरेदी केला जात असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. प्रति किलो 20 ते 22 रुपये दराने हा तांदूळ खरेदी केला जात असून, अनेक रेशन कार्डधारकही त्याला प्रतिसाद देत असल्याचे सांगितले जाते. ग्रामीण भागात फिरून मोठ्या प्रमाणात तांदूळ संकलित केला जात असल्याची माहिती नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
कर्नाटक सरकारने निवडणूक काळात दिलेल्या गॅरंटी योजनांपैकी अन्नभाग्य ही महत्त्वाकांक्षी योजना असून, प्रत्येक कुटुंबाला पोटभर अन्न मिळावे हा यामागचा उद्देश आहे. मात्र शासनाकडून मोफत मिळणाऱ्या तांदळाचा काही ठिकाणी व्यावसायिक हेतूने वापर होत असल्याची बाब चिंताजनक मानली जात आहे.
एकीकडे या योजनेसाठी कर्नाटक सरकारने मोठ्या प्रमाणात निधी खर्च करत असताना दुसरीकडे मोफत धान्याचा गैरवापर होत असल्याचे चित्र समोर येत आहे. त्यामुळे संबंधित प्रशासन व पुरवठा विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
