Top News

अंगारकी संकष्टीनिमित्त गणेशवाडीत ‘श्री’ दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

अनिल जासुद / शिवार न्यूज नेटवर्क :

अंगारकी संकष्टी निमित्त मंगळवारी गणेशवाडी (ता. शिरोळ) येथील श्री गणपती मंदिरात “श्री”चे मनोभावे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.

शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी येथे असलेले हे पुरातन, संस्थानकालीन श्री गणपती देवस्थान पंचक्रोशीत जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. उपलब्ध लिखित माहितीनुसार या मंदिराची स्थापना इ.स. १७५६ मध्ये कुरुंदवाड संस्थानचे हरभट जीवबा पटवर्धन यांनी केली आहे. हेमाडपंती बांधकाम शैलीतील हे स्वयंभू गणेश मंदिर कर्नाटकातील कुरुंद दगडापासून उभारण्यात आले आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून या देवस्थानाची ख्याती आहे.

अंगारकी संकष्टीला विशेष धार्मिक महत्त्व असून, या दिवशी उपवास केल्यास वर्षातील बारा संकष्टीचे पुण्य लाभते, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे अनेक भाविक संकष्टी व्रताची सुरुवात याच दिवसापासून करतात.

या पार्श्वभूमीवर कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासह कर्नाटकातूनही भाविक मोठ्या संख्येने येथे दाखल झाले होते. काही भाविक चारचाकी व दुचाकीने, तर अनेकजण पायी व अनवाणी चालत येऊन “श्री”चे दर्शन घेत होते.

अंगारकी संकष्टीनिमित्त सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेपर्यंत नित्यपूजा व अभिषेक पार पडला. दुपारी साडेबारा वाजता महापूजा, तर सायंकाळी साडेसात वाजता आरती व मंत्रपुष्पांजली झाली. मंदिर परिसरात रंगीबेरंगी रांगोळी काढून आकर्षक सजावट करण्यात आली होती.

भाविकांनी “श्री”चे दर्शन घेतल्यानंतर जवळील विठ्ठल-रखुमाई व रेणुका मंदिरालाही भेट दिली. वाढती गर्दी लक्षात घेऊन स्वयंसेवकांनी वाहनतळाची योग्य व्यवस्था केली होती. रात्री उशिरापर्यंत भाविकांची दर्शनासाठी गर्दी कायम होती.



थोडे नवीन जरा जुने