जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
दानोळी (ता. शिरोळ) येथील भरतेश्वर टोपगोंडा खून प्रकरणातील मुख्य संशयित राजदीप ताडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आर्थिक व्यवहाराच्या वादातून भरतेश्वर टोपगोंडा यांचा ऊसाच्या शेतात खून झाल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, संबंधित संशयित व मयत यांच्यात आर्थिक व्यवहार होते. घटनेच्या आदल्या दिवशी पैशांच्या मागणीसंदर्भात फोनद्वारे संपर्क साधल्याची बाब समोर आली आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मयत व्यक्तीवर अज्ञात साधनाने व लाथाबुक्यांनी मारहाण झाल्याची नोंद असून, त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे.
घटनेनंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेत विविध पथके तयार करून संशयितांचा शोध सुरू केला होता. त्यामध्ये मुख्य संशयित राजदीप ताडे याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून अधिक चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील इतर संशयितांचाही शोध पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, या घटनेमुळे दानोळी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
