इचलकरंजी / शिवार न्यूज नेटवर्क :
पंचगंगा नदीतील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आंदोलक आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष तीव्र होत असताना, या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सोमवार (दि. २७ एप्रिल) रोजी सकाळी ११ वाजता इचलकरंजी महापालिकेत महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस महापौर, आयुक्त, विरोधी पक्षनेते तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून शिरोळ तालुक्यातील बाधित गावांतील नागरिकांनी पंचगंगा प्रदूषणाविरोधात आंदोलन छेडले आहे. यापूर्वी प्रांत कार्यालयात दोन वेळा बैठका झाल्या; मात्र कोणताही ठोस निर्णय न झाल्याने आंदोलकांनी काळ्या ओढ्यावर बांध घालून प्रदूषित पाणी नदीत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता. परंतु हा बांध फुटल्याने पुन्हा एकदा प्रदूषित पाणी पंचगंगेत मिसळू लागले आहे.
या पार्श्वभूमीवर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देत आंदोलकांनी १ मेपासून कुरुंदवाड येथे आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तसेच इचलकरंजी महापालिकेने नदीत येणारे प्रदूषित पाणी कायमस्वरूपी बंद केले नाही, तर कुरुंदवाडमार्गे इचलकरंजीला होणारा शुद्ध पाणीपुरवठा रोखण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
या संदर्भात आंदोलनाचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “महापालिकेने नदीत येणारे प्रदूषित पाणी तातडीने थांबवावे, ही आमची साधी मागणी आहे. ती मान्य झाली नाही, तर टोकाचे आंदोलन करण्यात येईल.”
दरम्यान, भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 च्या कलम १३३ अंतर्गत इचलकरंजी प्रांताधिकारी संजय शिंदे यांनी महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ, पाटबंधारे विभाग तसेच संबंधित प्रक्रिया उद्योगांना नोटीस बजावली आहे. या विभागांच्या निष्काळजीपणामुळे सार्वजनिक उपद्रव निर्माण होत असल्याचा ठपका ठेवत, संबंधितांनी पुराव्यासह आपली भूमिका सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या प्रकरणाची सुनावणीही सोमवार (दि. २७ एप्रिल) रोजी दुपारी १२ वाजता प्रांत कार्यालय, इचलकरंजी येथे होणार असून, या बैठकीतून ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
