बाळासो कोकणे / शिवार न्यूज नेटवर्क :
घोसरवाड गावात साईभक्तांच्या पुढाकारातून आरोग्यदायी जीवनशैलीला चालना देणारा उपक्रम राबविण्यात आला आहे. श्री साईराम भक्त विजय कुबेर घाट यांनी स्वतःच्या स्वखर्चातून आपल्या शेतात साईभक्त व ग्रामस्थांसाठी योगसाधनेसाठी भव्य हॉल उभारला असून, या हॉलचे उद्घाटन माजी खासदार राजू शेट्टी व दत्तवाड येथील प्रसिद्ध डॉक्टर बसवराज पाटील यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
या उपक्रमामागे गावातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे आणि योगसाधनेची सवय लागावी, हा मुख्य उद्देश आहे. योगविधानासाठी दत्तवाड येथील शितल सूर्यवंशी हे दररोज पहाटे पाच वाजता येऊन विविध योगप्रकारांचे मार्गदर्शन करतात. त्यांना योगशास्त्राचे सखोल ज्ञान असून गावातील अनेक नागरिक नियमितपणे योगाभ्यासासाठी उपस्थित राहतात.
उद्घाटन सोहळ्यास गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये कुबेर घाट, राजू घाट, बाळासाहेब कमते, आकाराम पुजारी, दीपक संकपाळ, भाई, सुनील पाटील, शशिकांत बिंदगे, भोपाल नाईक, दादा वाणी, विधु बारवाडे, सुनील आकिवेटे, राजू माने तसेच घाट परिवारातील सदस्य आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
या उपक्रमामुळे घोसरवाड गावात आरोग्याबाबत जागरूकता वाढण्यास मदत होणार असून, युवकांसह ज्येष्ठ नागरिकांनाही याचा मोठा लाभ होणार आहे. ग्रामीण भागात अशा प्रकारचे उपक्रम राबविल्यास समाज आरोग्यदृष्ट्या सक्षम होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
