शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
संगमनेर तालुक्यातील वरळी येथे विठाबाई भाऊ मांग - नारायणगावकर तमाशा मंडळाच्या कलाकारांवर अज्ञाताकडून हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील कलाकार सुरक्षित आहेत का असा प्रश्न उपस्थित होतो. लोककलाकारावरील होणारे हल्ले रोखण्यासाठी शासनाने कडक कायदा करावा, कला निर्मिती संस्था यासह कलाकारांना विमा संरक्षण द्यावे अशी मागणी कलाविश्व रंगभूमी संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.
येथील कलाविश्व रंगभूमी व शिरोळ तालुका लोककलाकार संघटनेच्या वतीने आयोजित बैठकीत तमाशा कलावंतावरील भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला. ज्येष्ठ कलाकार लखन कांबळे बैठकीचे अध्यक्षस्थानी होते. एकपात्री कलाकार राजेंद्र प्रधान यांनी स्वागत करून बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी कलाविश्व रंगभूमीचे अध्यक्ष डॉ दगडू माने म्हणाले,
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीत लोक कलावंतांचे मोठे योगदान आहे. शाहीरी, भेदिक, लावणी यासह ऑर्केस्ट्रा व तमाशा क्षेत्रात काम करणारे अनेक कलाकार कलेचे संवर्धन करून कलेसाठी जगत असतात. संपूर्ण आयुष्य कलेसाठी खर्च करणाऱ्या लोककलावंतांना सन्मान मिळायला पाहिजे. ऑर्केस्ट्रा ,कलापतक ,तमाशा यासह चित्रपटसृष्टीतील अनेक तंत्रज्ञ व सहाय्यक कलाकारांना विमा संरक्षण नसते. त्यामुळे एखाद्या अपघाताच्या घटनेत
कलाकारांच्या कुटुंबाला कोणतीही मदत मिळत नाही. कार्यक्रमातील प्रवास व सादरीकरणावेळी कलाकारावर हल्ले होण्याचे प्रकार वाढत आहेत. अशावेळी शासनाने
कला संस्थेसह कलाकारांच्या संरक्षणाची जबाबदारी घ्यावी तसेच त्यांना विमा संरक्षण लागू करावे अशी मागणीही त्यांनी केली.
अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ कलाकार लखन कांबळे म्हणाले, काही दिवसापूर्वी विठाबाई भाऊ मांग - नारायणगावकर तमाशा मंडळाची गाडी अडवून कलाकारावर अज्ञाताकडून हल्ला झाला आहे. धारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन त्यांच्या कारवाई झाली आहे, मात्र लोकसंस्कृती जपणाऱ्या कलावंतावर हल्ले होणे ही बाब महाराष्ट्राला भूषणावह नाही.
या बैठकीस कलाकार मारुती कोळी, उदय शिरोळकर, राजेंद्र प्रधान, सचिन कमलाकर, रावसाहेब भोसले,अनिरुद्ध कोळी , विशाल कांबळे ,अनिल लोंढे ,मदन गावडे आदि उपस्थित होते. कलाकार दिवाण कोळी यांनी आभार मानले.
