अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
भारत वर्षीय दिगंबर जैन महिला महासभा नवी दिल्ली यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या, राष्ट्र पातळीवरील सर्वोत्कृष्ट पुरस्कार समजले जाणारे सर्वोत्तम श्राविका म्हणून धर्मनगरी बोरगाव येथील ज्येष्ठ समाजसेविका, वितराग महिला मंडळाच्या अध्यक्षा मीनाक्षी रावसाहेब पाटील यांना सन्मानित करण्यात आले. राष्ट्रसंत परमपूज्य प्रज्ञसागर मुनी महाराज यांच्या हस्ते मीनाक्षी पाटील यांना हा पुरस्कार मिळाल्याने बोरगाव शहराच्या शिरपेचात व जैन समाजात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
स्वर्गीय रावसाहेब पाटील दादा यांचे कुटुंबीय हे नेहमीच जैन धर्माच्या प्रगतीसाठी प्रामाणिक कार्य केले आहे. दादांनी दक्षिण भारत जैन सभेच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सोबतच मीनाक्षी पाटील देखील वीर महिला मंडळ व वितराग महिला मंडळ मार्फत समाजातील महिलांना एकत्रित करून त्यांना जागृत करण्याचे कार्य केले. महिलांच्या अडीअडचणी, होत असलेले महिलांचे शोषण तसेच महिलांना भेडसावणाऱ्या विविध समस्या याबाबत माहिती मिळवून त्या समस्या मिटविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्याचबरोबर मुनी महाराजांचे आचार-विचार समाजापर्यंत पोहोचवून सत्य, अहिंसा, त्याग, सेवा, समर्पण याबाबत समाजात जागृती केली. धार्मिक कार्यात अग्रेसर राहून ते यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्रीमती मीनाक्षी पाटील नेहमीच प्रयत्नशील असतात.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन भारत वर्षीय दिगंबर जैन महिला महासंघ नवी दिल्ली यांनी आयोजित आंतरराष्ट्रीय महिला दिन कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून बोलवून त्यांना मुनी महाराजांच्या हस्ते सर्वोत्तम श्राविका म्हणून सन्मानित केले.
या कार्यक्रमास आयोगाचे अध्यक्ष विजयाताई , स्वस्तिश्री धवलकीर्ती भट्टारक महास्वामीजी, भट्टाकलंक भट्टारक महास्वामीजी, सिद्धांतकीर्ती भट्टारक महास्वामीजी, अभिनव अरिहंतकीर्ती भट्टारक महास्वामीजी, भारत सरकारच्या राष्ट्रीय महिला रहाटकर, उद्योजिका शोभाताई धरीवाल, भारत वर्षीय दिगंबर जैन महिला संघाच्या राष्ट्रीय अध्यक्ष एम. के. सरिता जैन, दिपाली पाटील, धनश्री पाटील, अरिहंत संस्थेचे सीईओ अशोक बंकापुरे, युवराज पाटील उपस्थित होते. स्वर्गीय रावसाहेब पाटील दादा यांचे परिवार दक्षिण भारत जैन सभेच्या माध्यमातून अनेक धर्म व्याप्तीसाठी कार्य करीत आहेत.या पार्श्वभूमीवर मीनाक्षी पाटील यांना पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
