हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची खरी ताकद जिल्हा परिषद शाळांमध्ये आहे. या शाळांमधूनच अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन मोठ्या पदांवर पोहोचले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांचा विकास आणि विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या श्रद्धाताई गायकवाड यांनी केले.
हेरवाड येथील कुमार विद्या मंदिर शाळेच्या वतीने नूतन जिल्हा परिषद सदस्या श्रद्धाताई गायकवाड व जिल्हा परिषद सदस्य उत्तरादेवी शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी गायकवाड यांनी जिल्हा परिषद शाळांचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषद शाळा महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. अनेक विद्यार्थी या शाळांमधून शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करत आहेत. आज प्रशासनातील अनेक महत्त्वाच्या पदांवर जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतलेले विद्यार्थी कार्यरत असल्याचा अभिमान वाटतो, असेही त्यांनी नमूद केले.
तसेच हेरवाड येथील कुमार विद्या मंदिर शाळेच्या विकासासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले. शाळेतील विद्यार्थ्यांना चांगले शैक्षणिक वातावरण, पायाभूत सुविधा आणि आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले.
शिक्षण हेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचे खरे साधन असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्यावी, असे मार्गदर्शनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या शिक्षकांनी व व्यवस्थापनाने श्रद्धाताई गायकवाड यांचे आभार मानले. या कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी सरपंच रेखा जाधव यांनी देखील मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या उत्तरादेवी शिंदे, सामजिक कार्यकर्ते अविनाश गायकवाड, सर्व ग्रामपंचायत सदस्या, मुख्याध्यापक कांबळे सर, सर्व शिक्षक व पालक उपस्थित होते.
