जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
लिंगायत धर्म महासभा या संघटनेच्या राष्ट्रीय कोअर कमिटी सदस्यपदी सौ. रजनीताई मगदूम यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र महिला राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती वैशाली दिलीप पाटील यांनी दिले. जयसिंगपूर येथे संपन्न झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष आर. एस. देशिंगे यांचे मार्गदर्शनाखाली सौ.रजनीताई मगदूम यांची निवड करण्यात आली. प्रारंभी राष्ट्रीय सरचिटणीस बी.एस.पाटील यांनी या संघटनेची वाटचाल, लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता व अल्पसंख्यांक दर्जा घेण्यासाठी करावी लागणारी कार्यवाही याबाबत उपस्थिताना सविस्तर माहिती दिली.
यावेळी सौ. रजनीताई मगदूम म्हणाल्या की स्वर्गीय देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी या देशासाठी योगदान दिले आहे. घटना समितीचे सदस्य म्हणून देशाला त्यांची ओळख आहे. सध्या लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता आणि अल्पसंख्यांक दर्जा मिळविणे ही लिंगायत धर्मियांची सामुदायिक जबाबदारी आहे आणि याला घटनेचा आधार आहे. या संघटनेचे कार्य योग्य रीतीने सुरू असल्याचे मी जवळून अनुभवले आहे त्यामुळे या संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून कमिटी सदस्य पद स्वीकारण्याचे ठरवले होते. भविष्यकाळात या कार्यात यश येईपर्यंत आणि पुढेही सर्वांनी एकजुटीने कार्य करूया असे आवाहन केले. महिला राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती वैशाली पाटील, महिला राज्य अध्यक्षा सौ.श्रीदेवी संजय कबाडे, राज्य सरचिटणीस राहुल बापू कोठावळे, सांगली महिला जिल्हाध्यक्ष श्रीमती जयश्री खिलारे, ॲड.जगन्नाथ कमतगी,अशोक पाटील (कबनूर), बाबगोंडा पाटील (जांभळी) आदींनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी महिला राज्य सरचिटणीस श्रीमती भाग्यश्री कराडे,सांगली जिल्हाध्यक्ष दिलीप तांबडे, कोल्हापूर जिल्हा सचिव संजय पानदारे,शिरोळ तालुका अध्यक्ष अजित कागले, महिला तालुकाध्यक्षा सौ. सारिका आवटी, हातकणंगले तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील गडहिंग्लज तालुका अध्यक्ष आर. बी. पाटील, सचिव बी. एस. टोनपी, जयसिंगपूर महिला शहर अध्यक्षा सौ. शैलजा कमतगी, मिरज महिला शहर अध्यक्ष सौ.तेजस्वी तोरवी आदीसह कमिटी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार रायगोंडा पाटील (जांभळी) यांनी मानले.
