कुरुंदवाड (जि. कोल्हापूर) हे संस्थानकालीन गाव. जीवनदायिनी असलेल्या कृष्णा व पंचगंगा नदीच्या संगमावर वसलेले एक टुमदार गाव. गावाच्या तिन्ही बाजूनी घेराव घालून वाहणाऱ्या नद्या. सर्व शेती कशी सुपीक नदीकाठची. कधी निसर्गाच्या टोकाच्या आपत्तीचा सामना करावा लागला नाही. कधीही गावाला गेल्यावर पंचगंगा नदीवरचा वाडी रस्त्यावरचा पूल ओलांडताना चोहोबाजूंनी हिरवीगार शेती बघून जे मनाला समाधान वाटत असे त्याचे शब्दात वर्णन करता येणे केवळ अशक्यच. सध्या मात्र ह्या नद्याच ज्यावर इतके दिवस माज केला जायचा, त्याच ह्या परिसराच्या अस्तित्वाच्या मूळावर उठल्या आहेत की काय अशी शंका प्रत्येक कुरुंदवाडवासीयाच्या मनात येत आहे. कुरुंदवाडवासी पुराच्या नुसत्या कल्पनेने भेदरून गेला आहे. निसर्ग अशा विध्वंसाच्या टोकाला कधी आपल्याला नेईल असे स्वप्नात अथवा कल्पनेत पण कधी येथील लोकांना वाटले नव्हते. पण आज परिस्थिती पूर्णपणे १८० अंशात बदलली आहे तसेच निसर्गाने आपल्या वर्तनाचे एकदम विरुद्ध टोक गाठले आहे.
२००६, २००७ त्यानंतर २०१९ व काही प्रमाणात २०२१ अशा मोठ्या पुराच्या आठवणीनेच कुरुंदवाडकर घाबरून उठतो. ज्या नद्या आपल्याला समृद्ध बनवण्यात मदत करत होत्या ज्याचा आपणास अभिमान होता, त्याच नद्या मात्र आज या परिसराच्या अस्तित्वाला नख लावतील की काय अशी शंका जेंव्हा कुरुंदवाडवासीयांच्या मनात येते तेंव्हा थरकाप आजही उठत आहे. तसा कुरुंदवाड व परिसरात राहणाऱ्या लोकांसाठी पूर येणे म्हणजे काही नवी गोष्ट अजिबात नाही. पूर तसा तर दरवर्षीच कमी अधिक प्रमाणात येतच असतो. लोकांना सवय होती. परंतु २०१९ मध्ये निसर्गाचे रूपच रौद्र होते. पुराची मजा वाटण्या ऐवजी भीती वाटू लागली. तिथेच कुरुंदवाड व परिसराचे दिवसच पालटले.
जेंव्हा कुरुंदवाड शहरामध्ये २०१९ ला पूर आला होता तो १९१४ नंतर आलेला प्रचंड महापूर होता. त्याचे स्वरूप भयावह होते. त्यानंतर कुरुंदवाडच्या लोकांना वाटले की असा पूर काही दरवर्षी काही शक्य नाही. पण पुन्हा २०२१ मध्ये सुद्धा पुराची परिस्थिती निर्माण झाली जरी ती २०१९ च्या तुलनेत कमी होती तरी. अशापद्धतीने कुरुंदवाड ला पूर हा पाचवीला पुजला आहे असेच येथील लोकांना वाटू लागले आहे. पाणी कुठे आले. कोयना मधून किती विसर्ग चालू आहे? अलमट्टी धरणातून किती विसर्ग कर्नाटक सरकार करत आहे? असे अथवा असे अनेक प्रश्न आज त्याच्या मनात घर करून आहेत. त्यावर वेगवेगळ्या बातम्या प्रसारमाध्यमे, समाज माध्यमांद्वारे चर्चा चालू आहे. ज्या परिसराची ह्या नद्यांनी समृद्ध होण्यासाठी काळजी घेतली, येथील मुलाबाळांना आपल्या अंगाखांद्यावर खेळवून पोहायला शिकवले तसेच एकदा इथल्या नदीत उडी मारल्यावर कधी भीती वाटायची नाही. त्याच नद्या मात्र आज त्याच परिसराला बुडवायला निघाल्या आहेत. याला काय म्हणावे? कोणतीच गोष्ट ह्या नश्वर जगात कायमस्वरूपी नाहीत. इथली आजवरची असणारी समृद्धी व सुबत्ता सुद्धा हेच खरे आहे.
मग अलमट्टी धरण असो अथवा कमी वेळात पडलेला जास्त पाऊस, किंवा मोठमोठे रस्ते उंच करून त्यामुळे पाण्याला होणारा अवरोध असो, कारणे अनेक असतील. त्यावर तज्ञ चर्चा करतील उहापोह करतील. पण आज एककाळ सुखनैव जगणारा कुरुंदवाडकर मात्र ह्या निसर्गाच्या वर्तनाने भयग्रस्त झाला आहे हे निश्चित! कुठे ते कुठे ते कुरुंदवाड जे एकेकाळी सुखी, आनंदी व भयमुक्त वातावरणात राहून निसर्गाने उधळलेली सुबत्ता व समृद्धी उपभोगत होते आणि कुठे ते आजचे कुरुंदवाड जे ह्या दरवर्षीच्या कृष्णा – पंचगंगा नद्यांना येणाऱ्या पुराच्या भीतीने दुःखी व भयग्रस्त झाले आहे! पण माणसाची उपजत असेलेली विजिगीषू वृत्ती माणसाला आयुष्य कितीही संकटे आली तरी पुढे जाण्यास प्रवृत्त करत असतातच.
- ॲड. धैर्यशील सुतार



