Top News

श्री अरिहंत शाळा वतीने युवा नेते उत्तम पाटील यांचा भव्य नागरी सत्कार

 


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क : 

        बोरगाव येथील सहकार क्षेत्रात कार्यरत व निपाणी परिसरातील युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेले उत्तम रावसाहेब पाटील (अण्णा) यांची श्री अरिहंत को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड, बोरगाव (मल्टीस्टेट) या लोकप्रिय बँकेच्या नूतन संचालकपदी निवड झाल्याबद्दल बोरगाव व परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या पार्श्वभूमीवर आज बोरगाव येथील श्री अरिहंत स्कूल अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांतील शिक्षकांच्या वतीने उत्तम पाटील यांचा भव्य व दिमाखदार नागरी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात शिक्षकवर्ग, मान्यवर व विद्यार्थ्यांनी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत उत्तम पाटील यांना शाल, श्रीफळ व पुष्पहार अर्पण करून गौरविण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून उत्तम पाटील यांच्या सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील योगदानाचे कौतुक केले. त्यांनी युवकांसाठी प्रेरणादायी कार्य करत समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचे काम केले असल्याचे शिक्षक वृंद यांनी नमूद केले. उत्तम पाटील यांच्या निवडीमुळे बँकेच्या कार्याला अधिक गती मिळेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

      सत्काराला उत्तर देताना उत्तम पाटील म्हणाले की हा सन्मान आपल्यासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगून, भविष्यातही समाजहिताचे कार्य अधिक जोमाने करण्याचा संकल्प व्यक्त केला. सहकार क्षेत्र मजबूत करण्यासाठी आणि सर्वसामान्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

   यावेळी श्री अरिहंत रुरल डेव्हलपमेंट स्कूल सोसायटीचे सी इ ओ, बी ए हवले, मुख्याध्यापक दयानंद सदलगे, हायस्कूलचे मुख्याध्यापक एस ए पाटील, आय टी आय कॉलेज चे प्रिन्सिपॉल व्हि. बी शिरहट्टी, आर ए पाटील पब्लिक स्कूल चे प्रिन्सिपॉल श्रीनिवास सर, व्हॉईस प्रिन्सिपॉल शमिका शहा,श्री अरिहंत कन्नड शाळेचे मुख्याध्यापक आर एम मगदूम सह सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने