संजय चव्हाण / शिवार न्यूज नेटवर्क :
सैनिक टाकळी- खिद्रापूर या मुख्य रस्त्यावर दोन फुटांवर पुराचे पाणी आले आहे. त्यामुळे गावांचा पूर्णपणे संपर्क तुटला आहे. राजापूरवाडी येथे पूरस्थिती गंभीर बनली असून तिन्ही गावांना बेटाचे स्वरूप आले आहे. आतापर्यंत खिद्रापूर, राजापूर, राजापूरवाडी येथील सुमारे 300 कुटुंबातील 3 हजार लोकांनी जनावरांसह स्थलांतर केले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.
सैनिक टाकळी कडून खिद्रापूर कडे जाणाऱ्या ओतावरील फुलाच्या दुतर्फा रस्त्यावर रात्री 1 फुटाणे पाण्यात वाढ झाली. यामुळे आज वाहतूक बंद झाली आहे. या ठिकाणी पाण्याचा वेग प्रचंड आहे. तरीही काहीजण पाण्यातून दुचाकी- चारचाकी नेत असल्याचे दिसून आले आहे.
खिद्रापूर, राजापूर, राजापूरवाडी येथील नागरिकांना बाहेर पडण्यासाठी केवळ सैनिक टाकळी येथील हा एकच मार्ग उपलब्ध होता. त्यातूनच नागरिकांची ये-जा चालू होती. मात्र या मार्गावर रात्री पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे.
