Top News

विद्यार्थी घडवणारा शिक्षक हा खरा शिल्पकार असतो : प्राचार्या कमला हार्डीकर

 


इचलकरंजी / शिवार न्यूज नेटवर्क :

"अशुभ संस्कार निरामयम्। शुभ संस्कार सिंचनम् ॥" संस्कार म्हणजे दिलेली वेळ पाळणे, अपूर्णतेकडून पूर्णत्वाकडे जाणे होय, विद्यार्थ्यांनी यशाने हुरळून जाऊ नये व अपयशाने खचून जाऊ नये. यशाकडे सतत वाटचाल करत रहावे. शिक्षकांच वागणं, उक्ती व कृती संस्कारमय असावी. विद्यार्थ्यांना माणसं माणसांशी जोडायला शिकवा, देश आपोआप जोडला जाईल. जीवनात यशस्वी व्हावयाचे असेल तर स्वतःची तुलना इतरांशी करु नका. आपल्यात काय नाही हे शोधू नका तर आपल्यात काय आहे हे शोधा. विचार करत वेळ घालवण्यापेक्षा कृतीवर भर दया. विद्यार्थ्यांनी एक कल्पक विद्यार्थी बनून व भविष्याचा वेध घेऊन शिक्षण घ्यावे, जीवनात भरकटणारे अनेक मोह असतील व दिसतील परंतु, शिक्षण हे सत्व आहे, शिक्षण हे तत्व आहे, शिक्षण स्वावलंबी बनवते, ते धाडसी बनवते, स्वाभिमानी बनवते, आत्मभाग जागृत करते, यामध्येच मातापित्यांचे उपकार विसरु नका, शिक्षक व शाळा यांच्याशी सदैव संलग्न रहा. आपल्यातील माणुसकी जागी ठेवा, त्यातूनच विकास साधतो, पराक्रम व त्याग आपली संस्कृती आहे ती जपा, आपल्यातील अध्ययनाने स्वतः घडत-घडत इतरांना घडवत रहा. अशा प्रकारे संस्कार व गोष्टीच्या माध्यमातून संस्काराची पेरणी करत करत विद्यार्थी व उपस्थितांना खिळवून ठेवणारे प्रेरणादायी मार्गदर्शन श्री बालाजी माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या महेश क्लब ऑफ इचलकरंजी येथे पार पडलेल्या २६ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमप्रसंगी थोर विचारवंत, प्रेरणादायी वक्त्या तथा देवचंद कॉलेज अर्जुननगरच्या माजी प्राचार्य मा. कमला हर्डीकर मॅडम यांनी प्रमुख पाहुणे म्हणून केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक चेअरमन मा. मदन कारंडे साहेब होते. संस्थेचे उपाध्यक्ष मा. रमेशचंद्र बांगडसाहेब, सेक्रेटरी महेशराव कोळीकालसाहेब, संचालक संदीप जाधव यांच्या प्रमुख उपस्थित कार्यक्रम पार पडला.

संस्थापक अध्यक्ष मा. मदनराव कारंडेसाहेब यांनी विदयार्थ्यांना संबोधित करताना, विद्यालयाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या संस्थेच्या यशाचा आलेख सांगत विद्यार्थ्यांना चिरंतन कार्यरत रहा व शाळा समाज व देशाचे नाव उज्वल करा. नवीन नवीन गोष्टी आत्मसात करा. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. भविष्याचा वेध घेत-घेत शिक्षणाच्या माध्यमाधून जीवनाचा पाया मजबूत करा. असे सांगत काळाप्रमाणे आपणही धावले पाहिजे, जग खूप वेगवान आहे, याचा सदैव विचार करत रहा, त्यात सहभागी व्हा.जीवनात आत्मीयता, जिद्द आत्मविश्वास व नितीमूल्ये यांची प्राप्ती झाली तरच जीवन यशस्वी होते व तो विद्यार्थ्यांनी करावा असा आशवाद व्यक्त केला,


प्रारंभी प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन होऊन कार्यक्रमास सुरवात झाली, प्रशालेच्या विदयार्थ्यांनी आपल्या स्वागतगीतामधून उपस्थितांची मने जिंकली, प्रमुख पाहुण्याचे स्वागत व सत्कार अध्यक्ष मदनराव कारंडे साहेब यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन केला. उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री. डी. वाय. नारायणकर सर यांनी गुलाबपुष्प देऊन केले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक मुख्याध्यापिका सौ. एम. एस. रावळ मॅडम यांनी वर्षभरामध्ये प्रशालेने विविध स्पर्धा व इतर उपक्रमाच्या माध्यमातून घेतलेली गगनभरारी यांचा धावता आढावा घेतला व यापुढे प्रशाला विदयार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध असेल असे प्रतिपादन केले.

प्रशालेने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी वर्धापन दिनाचे औचित्य साधून वर्धापनदिनाच्या निमित्ताने प्रशालेमध्ये वक्तृत्व व चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये यशस्वी विदयार्थ्यांना प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. प्रा. कुमार कांबळे सर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. सदर कार्यक्रमासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक / शिक्षकेतर वृंद व विदयार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार उपमुख्याध्यापक श्री डी. वाय. नारायणकर सर यांनी केले, तर सूत्रसंचालन कु. एस. व्ही. पाटील मॅडम व कु.एस. जे. महाजन मॅडम यांनी केले

थोडे नवीन जरा जुने