जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ तालुक्यात महापूरच येऊ नये, यासाठी महाराष्ट्र शासन आणि कर्नाटक शासन यांच्यामध्ये समन्वय साधून प्रयत्न करणार आहे. अचानक तीन चार दिवसांत ढगफुटीसदृश पाऊस झाल्यास शिरोळ तालुक्याला महापुराचा फटका बसू शकतो. त्यामुळे सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी योग्य नियोजन करावे. मनुष्यहानी व पशुधनाची हानी होता कामा नये. पूर गेल्यानंतर आठ दिवसांत तातडीने सर्व पंचनामे पूर्ण करावेत. अधिकारी, कर्मचारी यांच्यामुळे कोणतीही गैरसोय झाल्यास गय करणार नसल्याचा इशारा आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिला.
जयसिंगपूर येथील स्व.शामराव पाटील-यड्रावकर नाट्यगृहात संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी दुपारी आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी आमदार यड्रावकर बोलत होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी महापुराबाबत सर्व प्रशासनाला सुचना देऊन गाफील राहिला तर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
प्रथम आढावा देताना गटविकास अधिकारी नारायण घोलप म्हणाले, तालुक्यातील पूरबाधीत गावांना महापुराबाबत योग्य त्या सूचना देऊन अधिकारी व कर्मचार्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. आता फक्त अधिकारी, कर्मचारी, पोलिस व ग्रामस्थ यांची बैठक घेऊन सर्व नियोजन करणार असल्याची माहिती दिली.
यावेळी तहसिलदार अनिलकुमार हेळकर म्हणाले, संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागाच्या प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. त्यामुळे यात कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. इशारा पातळीवर पाणी आल्यास प्रशासनाला दिलेल्या सर्व सुचनांचे पालन करून कामाला लागावे, असे त्यांनी सांगितले.
त्यानंतर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.पांडुरंग खटावकर यांनी आरोग्यविषयक, पंचायत समिती बांधकाम उपअभियांना संदेश बदडे, सा.बां.विभागाचे उपअभिंयंता तुषार शिरगुप्पे यांनी तालुक्यातील रस्त्यांची माहिती दिली. त्याचबरोबर पाटबंधारे विभागाचे सहाय्यक उपअभियंता मोहन गळंगे यांनी सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत जांगळे-पाटील, आगारप्रमुख नामदेव पतंगे, जयसिंगपूर, शिरोळ, कुरूंदवाड पालिकेचे अधिकारी व पोलिस निरिक्षक यांनी केलेल्या नियोजनाची माहिती दिली.
त्यानंतर शिरोळ तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ यांनी महापूर काळात येणार्या अडचणी सांगितल्या. यावेळी या अडचणी दूर करण्याचे आश्वासन प्रशासनातील अधिकार्यांनी दिल्या.
