Top News

सलगरे - हेरवाड मार्गावर गतिरोधक बसवा अन्यथा रस्ता रोको आंदोलन करणार : बंडू बरगाले


हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

वारंवार वादाच्या भवऱ्यात असणारा सलगरे - हेरवाड रस्त्यामुळे नेहमीच वाहनधारकांना त्रास सोसावा लागला आहे. रस्ता पूर्ण होऊन सुद्धा रस्त्यावर गतिरोधक नसल्यामुळे तसेच ठीक ठिकाणी पांढरे पट्टे मारले नसल्यामुळे अपघातांची मालिका या मार्गावर सुरू आहे. त्यामुळे संबंधित बांधकाम विभागाने तातडीने हेरवाड पासून सलगरे पर्यंत गतिरोधक तसेच पांढरे पट्टे येत्या आठ दिवसात न मारल्यास पुढच्या आठवड्यात ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते बंडू बरगाले यांनी दिला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करून संबंधित बांधकाम विभाग तसेच प्रमुखांची बैठक बोलावून ज्या - त्या ठिकाणी गतिरोधक तसेच पांढरे पट्टे मारण्याच्या सूचना कराव्यात, अशीही मागणी बरगाले यांनी केली आहे.

 यावेळी बोलताना बरगाले पुढे म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याचे काम सुरू होते. अनेक वेळा रस्त्याचे काम रखडले होते. रखडत - रखडत का होईना हा रस्ता पूर्ण झाला आहे. अद्यापही अनेक ठिकाणी किरकोळ कामे बाकी आहेत. मात्र, याकडे संबंधित ठेकेदार अथवा बांधकाम विभागाचे अधिकारी लक्ष देत नाहीत. रस्त्याच्या कामात हजारो झाडांची कत्तल झाली होती. त्या बदल्यात रस्त्याच्या आराखड्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूने झाडे लावण्याचे नमूद आहे. मात्र, काही ठिकाणीच झाडे लावून संबंधित प्रशासन जनतेची दिशाभूल करीत आहे. 

 याचबरोबर या मार्गावर वर्दळीच्या ठिकाणी, गावाच्या तसेच पेट्रोल पंपाच्या ठिकाणी गतीरोधक नसल्याने अपघात घडत आहेत. या अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. तर अनेकजण जखमी होत आहेत. त्यामुळे ही अपघाताची मालिका थांबविण्यासाठी तातडीने या मार्गावर गतीरोधक तसेच पांढरे पट्टे मारण्यात यावेत, यासाठी पोलिस प्रशासनाने मध्यस्ती करून बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदाराची बैठक बोलवावी व ही समस्या कायमची सोडवावी, अशी मागणी बरगाले यांनी केली आहे.

थोडे नवीन जरा जुने