शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
आमचे नेते शरदचंद्रजी पवार व जयंत पाटील यांच्या आदेशाशी आम्ही बांधील असून महाविकास आघाडीच्या वतीने उद्धवजी ठाकरे यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सत्यजित पाटील सरूडकर यांना उमेदवारी नुकतीच जाहीर केली असल्याने शिरोळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वच पदाधिकारी सरूडकर यांच्या पाठीशी राहून शिरोळ तालुक्यातून त्यांना मोठे मताधिक्य देण्यात येईल, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शिरोळ तालुका अध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे व जिल्हा उपाध्यक्ष बी. जी. माने यांनी दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले, स्वाभिमानीचे संस्थापक राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीच्या वतीने मशाल चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी आवाहन केले होते, मात्र राजू शेट्टी यांनी या आवाहनाला प्रतिसाद न देता स्वाभिमानीच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात उतरल्याने महाविकास आघाडीचे नेते उद्धवजी ठाकरे यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सत्यजित पाटील सरूडकर यांना संधी दिली असल्याने पक्षाचा आदेश तोच आमचा अंतिम आदेश असल्याने सत्यजित पाटील सरूडकर यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहून शिरोळ तालुक्यातून मोठे मताधिक्य त्यांना देणार असल्याचे सांगितले.
