Top News

संभाजीराव भिडे यांची गाडी आडविणाऱ्यावर कारवाई करावी : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या पदाधिकाऱ्यांची मागणी

 




शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे गुरुवर्य संभाजीराव विनायकराव भिडे (गुरुजी ) यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या जमावावर कायदेशीर कारवाई करावी . भिडे गुरुजी यांना विशेष सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने करण्यात आली. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख रावसाहेब देसाई व शिरोळ तालुका प्रमुख प्रवीण चुडमुंगे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाच्या वतीने शिरोळ तहसीलदार अनिलकुमार हेळकर व शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांना सोमवारी निवेदन देण्यात आले.

         निवेदनात म्हटले आहे की , गुरुवर्य संभाजीराव भिडे (गुरुजी )हे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे संस्थापक आहेत . महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेरील अनेक राज्यातील युवा पिढीला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांना आदर्श मानून तत्त्वनिष्ठ , धर्मनिष्ठ ध्येयवादी तरुण निर्माण व्हावेत यासाठी भिडे गुरुजी हे कार्य करीत आहेत. या संघटनेत कोणताही जात , पंथ , वर्णभेद नाही .हिंदुत्वावादी विचार म्हणजे जातीयवादी विचार मानणाऱ्या अनेक व्यक्ती , संघटना त्यांना विरोधासाठी विरोध करीत आहेत .

भिडे गुरुजी यांना समाजात आदराचे स्थान आहे . २९ फेब्रुवारी २०२४ रोजी नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथील नियोजित कार्यक्रम आटोपून धुळे येथे जात असताना काही पळकुट्या ,विचारशून्य व स्टंटबाजी करणाऱ्या जमावाने भिडे गुरुजी विरोधात घोषणाबाजी करून , गाडीच्या आडवे येऊन अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली . या घटनेचा शिवप्रतिष्ठानचे धारकरी जाहीर निषेध करीत आहेत. भिडे गुरुजींच्या गाडीच्या आडवे येणाऱ्या जमावाचा पूर्वनियोजित कट होता. गुरुजींच्यावर हल्ला करण्याचा कपटी डाव होता. त्यामुळे स्टंटबाजी करणाऱ्या संबंधित जमावावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी . समाज कंटकाकडून अनुचित कृत्य घडू नये या कारणास्तव गुरुवर्य भिडे गुरुजी यांना राज्यात व राज्याबाहेर कायमस्वरूपी विशेष सुरक्षा व्यवस्था देण्यात यावी अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

थोडे नवीन जरा जुने