Top News

शिक्षणाची गंगा सर्वांसाठी खुली करावी : आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर

 


जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

 शिक्षकांच्या जीवनात सेवानिवृत्तीच्या वेळी किती मुले घडविली? असा प्रश्न पडतो तेंव्हा आपण घडविलेली मुले समोर येतात.राजू यळगुडे या मुख्याध्यापकांनी घडविलेला सरपंच क्वचितच योगायोग आहे.जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांचा स्तर वाढवावा.खाजगी शाळेशी स्पर्धा करणारा विद्यार्थी घडवावा. शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुलांना घडवावे. असे आवाहन त्यांनी केले. सेवानिवृत्तीनंतर यळगुडे सर निश्चितपणे हे कार्य करतील अशी आशा वाटते.मोठमोठी माणसे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकली त्याप्रमाणे शिरोळ तालुक्यातील मुलेही घडविण्याचे कार्य शिक्षकांनी करावे.शिक्षणाची गंगा सर्वासाठी खुली करावी.कुमार विद्या मंदिर मराठी आलास शाळे चे मुख्याध्यापक राजेंद्र आप्पासो यळगुडे यांच्या सेवानिवृत्ती समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

            याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले,- राजेंद्र यळगुडे सरांनी आजपर्यंत अनेक शिक्षकांची कामे केली. यळगुडे घराणे हे स्वाभीमानी घराणे आहे.शेतकऱ्यांचे प्रश्न मिटविण्यासाठी यळगुडे सरांनी बिल्ला लावून यावे असे आवाहन केले.गरीबांच्या घरी शिक्षण पोहचविण्याचे कार्य छत्रपती शाहू महाराज यांनी केले.कोल्हापूर संस्थानातील महसूलाचा सहा टक्के इतका वाटा शिक्षणासाठी खर्च केला.विविध जातीधर्मासाठी वसतीगृहे सुरु केले. आजचे राज्यकर्ते फक्त शाहूंचे नाव घेणारे आहेत त्यांचे विचार अंमलात आणणारे नाहीत.आज समाजात मोठी दरी निर्माण होत आहे.श्रीमंत- गरीब यांच्यातील अंतर वाढत जावून दरी निर्माण होत आहे.अतिगरीब लोक शिक्षणांपासून वंचित होत आहेत.कोल्हापूर जिल्हयात पटसंख्ये अभावी शासन शाळा बंद करीत आहे.आज सर्वत्र चंगळवाद वाढत आहे. चंगळवाद करण्यासाठी गुलामांची गरज आहे.ती गरज पूर्ण करण्यासाठी सर्वसामान्य गोरगरीबांच्या मुलांना शिक्षणापासून दूर करण्याचे षढयंत्र रचले जात आहे.  शिक्षकांनी शेवटच्या घटकांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

सर्वांना समानतेने वागविले पण आताची परिस्थिती बदलली आहे.शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे.शिक्षण घेतलेल्यांनी अन्यायाविरूध्द गुरगुरले पाहिजे. प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील यांनी आपल्या मनोगतातून यळगुडे यांच्या कार्याचा गौरव करताना म्हणाले,आमचे आजोबा म.ल.पाटील यांच्यामुळे शेडशाळमध्ये शिक्षकांची फळी निर्माण झाली.शिक्षक संघांची बिकट अवस्था असताना राजेंद्र यळगुडे सरांचे कार्य उल्लेखनीय आहे.बॅ.बाळासाहेब खर्डेकर पतसंस्थेच्या जडणघडणीत त्यांचे महत्वाचे योगदान आहे.यळगुडे सर शांतपणे एखादी गोष्ट,प्रश्न सोडविणेसाठी वाकबगार आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीमुळे पोकळी निर्माण होत आहे. त्यांना सेवानिवृत्तीपर दुसऱ्या इनिंगसाठी शुभेच्छा देतो.

शिक्षक नेते राजू जुगळे म्हणाले, -संघटनेच्या कामात अतिशय झोकून देवून काम करतांना सर्वांशी घनिष्ठ संबंध निर्माण केले होते.सर्व कौशल्य पणास लावून काम पूर्ण करायचे यामध्ये त्यांचा हातखंडा होता.यळगुडे कुटुंबियांनी शैक्षणिक कार्यासाठी एखादे फौंडेशन सुरु करुन होतकरू व गरीब कुटुंबातील मुलांसाठी मार्गदर्शन केंद्र सुरु करावे.

         शिक्षक संघाचे माजी राज्याध्यक्ष राजाराम वरुटे म्हणाले, -राजू यळगुडे यांनी वेळेची तमा न बाळगता शिक्षकांचे कार्य केले.अनेक संघर्षातून भरारी घेतली.कठीण परिस्थितीत आलास मध्ये त्यांनी केलेल्या कार्याला तोड नाही. त्यांच्या कामाचे चीज झाले आहे.समाजाची बांधिलकी म्हणून शाळेचे कार्य पाहून संघटनेचे कार्य केले. त्यांच्या निष्ठेला संघटनेमार्फत सलाम. शिक्षकांचे प्रश्न सोडविणारा संघर्ष योध्दा आज निवृत होतोय. त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा देतो.

       सूनबाई सौ रिचिता राहूल यळगुडे म्हणाल्या- आमच्या पप्पांची २७ वर्षाची सेवा उल्लेखनीय झाली आहे. आज सेवानिवृत होत आहेत पण त्यांच्या आयुष्याचा बराच वेळ सेवेत गेला.त्यांनी सर्व दुःख एकटेच भोगले.त्यांचा वक्तशीरपणा व कामाची धडपड ही त्यांची खाशीयत आहे.  अध्यक्षस्थानावरून बोलताना शिक्षक नेते दामोदर सुतार म्हणाले,३८वर्षाच्या सेवेमध्ये अनेक मुलांना घडविण्याबरोबरच शिक्षकांचीही कामे संघटनेमार्फत त्यांनी केले. त्यांच्या शैक्षणिक योगदान वाखाणण्यासारखे आहे.त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी शुभेच्छा देतो.

         याप्रसंगी प्रमुख उपस्थिती राज्य संपर्क प्रमुख एस.व्ही. पाटील,शिक्षण विस्तार अधिकारी दिपक कामत,अनिल ओमासे,भगवान कोळी,सुरेश पाटील,उत्तम कोळी,बजरंग लगारे,राजमोहन पाटील,प्रशांत पोतदार,अरविंद मजलेकर,केंद्र प्रमुख दत्तात्रय जाधवर,आण्णा मुंडे,नारायण वडाम,मनोज माळवदकर,एम.डी.पाटील,

विष्णु काटकर,शांताराम हेमगिरे,भूपाल दिवटे,मेहबूब मुजावर,दिलीप शिरढोणे,कुमार सिदनाळे,सहदेव माळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन -श्री. व सौ.उदय गायकवाड,अनिल सुतार यांनी केले.प्रास्ताविक -दिलीप पाटील यांनी केले तर आभार आलास गावचे सरपंच सचिन दानोळे यांनी केले.

थोडे नवीन जरा जुने