इस्लामपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
साखर कारखान्यांनी गत गळीत हंगामात चांगला पैसा मिळविला असून ऊस उत्पादक शेतक-यांचा उत्पादन खर्च वाढल्याने कारखान्यांनी या वर्षीचा गळीत हंगाम सुरू होण्याआधी ४०० रूपयाचा दुसरा हप्ता द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राजारामबापू साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर केली.
१७ ॲाक्टोंबर पासून राजू शेट्टी यांनी गत गळीत हंगामातील ऊसाला दुसरा हप्ता ४००रूपये व राज्यातील सर्व साखर कारखान्याचे वजनकाटे डिजिटल करण्यासाठी २२ दिवसाची ५२२ दिवसाची आक्रोश पदयात्रा काढण्यात आली होती. दरम्यान मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावल्याने ३० ॲाक्टोंबर रोजी पदयात्रा स्थगित केली होती. आज राजारामबापू कारखान्यास निवेदन देवून तिथून परत पदयात्रेस सुरवात करण्यात आली.
साखर कारखानदारांनी कारखान्याची गाळप क्षमता वाढविली असून या खर्चाचा बोजा शेतक-यांच्यावर टाकला जात आहे. कोट्यावधी रूपयाचा चुराडा करून प्रकल्प उभे केले जात आहेत. या प्रकल्पाच्या कर्जाचा बोजा यंदा साखर कारखान्यांनी शेतक-यांच्या जादा आलेल्या ऊत्पन्नातील हिस्यावर टाकून कारखान्यांनी तो पैसा कर्ज खात्यास वर्ग केला आहे. यामुळे कारखान्यांनी कोणतेही कारण न सांगता ४०० रूपयाचा दुसरा हप्ता द्यावा. साखर उद्योगामध्ये केंद्र सरकारने अनेक कायद्यामध्ये सुधारणा करण्याची गरज असून यासाठी कारखानदार , साखर संघ , इस्मा , विस्मा यासारखे संस्था ईडी व सीबीआय याला भिवून मुग गिळून गप्प आहेत. या सर्वाचा बोजा शेतक-यांच्यावर टाकून शेतक-यांना मातीत गाडण्यासाठी कारखानदार , केंद्र सरकार , विरोधी पक्ष हातात हात घालून काम करत आहेत.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक आर डी माऊली यांनी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे निर्माण झालेल्या कारखानदाराच्या समस्यांचा पाढा वाचला. राजारामबापू यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून त्याचठिकाणी कारखाना पदाधिकारी यांना ४०० रूपयाचा हप्ता दिल्याशिवाय कारखाना सुरू न करण्याचे निवेदन दिले.
