Top News

शिक्षण प्रसारक मंडळाची स्वच्छ व पारदर्शक कार्यशैली अभिमानास्पद : तुकाराम नाईक

 


     कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क : 

 सामाजिक संवेदना असणाऱ्या असंख्य समाज बांधवांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या कार्यावर प्रचंड विश्वास आहे. “समाजातून समाजाला” या तत्वास अनुसरून समाजातील आर्थिक दृष्ट्या सबलांच्याकडून मदत घेऊन ही मदत गरजू व्यक्ती व संस्था यांच्यापर्यंत पोचवण्याची मोठी जबाबदारी जनकल्याण समितीवर असते. येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्वच्छ व पारदर्शक कार्यशैलीचा आम्हाला अभिमान असून जनकल्याण समितीने केलेली मदत अत्यंत योग्य ठिकाणी पोचल्याचे आम्हाला समाधान आहे असे उद्गार या समितीच्या महाराष्ट्र प्रांताचे कार्यवाह तुकाराम नाईक यांनी काढले. 

               शि. प्र. मंडळाच्या कै.रामचंद्र विठ्ठल फडणीस व कै. जानकीबाई रामचंद्र फडणीस प्राथमिक विद्यामंदिर ,कुरुंदवाड या प्रशालेच्या नूतन इमारतीच्या तळमजल्याचे उद्घाटन व नामकरण समारंभात प्रमुख पाहुणे या नात्याने श्री. नाईक बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष अवधूत दिगंबर पुजारी हे होते.

 याप्रसंगी बोलताना जनकल्याण समितीचे कोषाध्यक्ष प्रदीप पराडकर म्हणाले की, संस्थेने प्राथमिक विद्या मंदिरासाठी सर्व सोयीं- सुविधांनीयुक्त अशी वास्तू उभारली आहे याचे आम्हाला कौतुक आहे. शतक महोत्सवाकडे दिमाखदारपणे वाटचाल करणाऱ्या या संस्थेच्या वैभवशाली परंपरेत सैनिकी पॅटर्न निवासी शाळेने मोलाची भर घातली आहे. शि. प्र. मंडळाला जनकल्याण समितीचे नेहमीच मार्गदर्शन व सर्वोतोपरी सहकार्य राहील. 

 यावेळी कै. जगन्नाथ वामन तेरवाडकर ( सांगली ) यांच्या स्मृती प्रीत्यर्थ शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव सौ. सीमा सुहास जमदग्नी यांच्या तसेच कै. सुशीला लक्ष्मण जमदग्नी यांच्या स्मरणार्थ निवृत्त बँक अधिकारी सुहास लक्ष्मण जमदग्नी यांच्या बहुमोल देणगीतून बांधण्यात आलेल्या वर्ग कक्षांचे उद्घाटन जनकल्याण समितीचे सहकोषाध्यक्ष व प्रख्यात चार्टर्ड अकौंटंट चंदनजी कटारिया यांच्या हस्ते करण्यात आले.  

 स्वागत व प्रास्ताविक संस्थेच्या सचिव सौ. सीमा जमदग्नी यांनी केले. संस्थेच्या नियामक मंडळाचे चेअरमन प्रा. शरद पराडकर यांनी जनकल्याण समिती विषयी कृतज्ञता व्यक्त करून संस्थेच्या भावी योजनाविषयी माहिती दिली. आभार संचालक रविकिरण गायकवाड यांनी केले. सुत्रसंचालन सहाय्यक शिक्षक विश्वास पाटील यांनी केले. संस्थेच्या सैनिकी पॅटर्न निवासी शाळेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, रा. स्व. संघाचे जिल्हा सहकार्यवाह संतोष पाटील , तालुका कार्यवाह दिलीप पटेल यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

थोडे नवीन जरा जुने