कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
क्रीडा शिक्षकासाठी आवश्यक असणारे जिद्द, चिकाटी आणि संघभावना हे गुण पासोबा मॅडम यांच्या अंगी शालेय जीवनापासूनच होते. कुरुंदवाड व परिसराचा मानबिंदू असणाऱ्या सीताबाई पटवर्धन हायस्कूल मधील क्रीडा विभाग प्रमुखपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळताना त्यांनी खो-खो, व्हॉलीबॉल सह विविध खेळातील खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन केले आहे असे कौतुकोद्गार ज्येष्ठ क्रीडा संघटक व सहकार भूषण एस. के. पाटील महाविद्यालयाचे माजी प्राचार्य बी.डी सावगावे यांनी काढले.
येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सीताबाई पटवर्धन हायस्कूल मधील ज्येष्ठ शिक्षिका व क्रीडाविभाग प्रमुख सौ. रंजना पासोबा - शेट्टी यांच्या सेवानिवृत्ती समारंभात प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेच्या नियामक मंडळाचे चेअरमन प्रा. शरद पराडकर हे होते.
याप्रसंगी बोलताना प्रा. सावगांवे पुढे म्हणाले की, स्वतः राष्ट्रीय खेळाडू असणाऱ्या सौ. पासोबा यांना मी महाविद्यालयीन जीवनापासून अत्यंत जवळून ओळखतो. त्या माझ्या विद्यार्थिनी आहेत याचा मला सार्थ अभिमान वाटतो. एक क्रीडा प्रशिक्षक या नात्याने मला मिळालेल्या यशामध्ये सौ. पासोबा व त्यांच्या सहकारी खेळाडूंचा मोलाचा वाटा आहे.
अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना प्रा. पराडकर म्हणाले की, सौ. पासोबा यांनी सीताबाई पटवर्धन हायस्कूलच्या 97 वर्षाच्या वैभवशाली परंपरेत आपल्या गौरवास्पद कामगिरीने मोलाची भर घातली आहे. त्यांनी तन – मन - धन अर्पून केलेली शाळेची व मैदानाची सेवा नेहमीच स्मरणात राहील. आपल्या शाळेशी, संस्थेशी नेहमीच कमालीच्या प्रामाणिक असणाऱ्या सौ. पासोबा यांचा संस्थेला सार्थ अभिमान आहे.
यावेळी संस्थेच्या संचालिका सौ. श्रद्धा कुलकर्णी यांच्या हस्ते सौ. पासोबा यांचा तर जेष्ठ संचालक तातोबा शहापुरे यांच्या हस्ते त्यांचे पती सुरेश शेट्टी यांचा सत्कार करण्यात आला.
संस्थेच्या सैनिकी पॅटर्न निवासी शाळेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सीताबाई पटवर्धन हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रसाद कुलकर्णी यांनी केले. याप्रसंगी सहाय्यक शिक्षक सदानंद पाटील, क्रीडा शिक्षक बाबासाहेब भुजगडे यांच्यासह प्रा.जगदीश झाडबुके व प्रा. आप्पासाहेब भगाटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आभार सौ. कल्पना पाटील यांनी मानले.
या समारंभास संस्थेचे पदाधिकारी, संस्था संचलित सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, खेळाडू यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
