तलाठी नाही ; हेरवाडची जनता 'परेशान'
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
तलाठी कार्यालय म्हटलं की नागरिकांची ओसंडलेली गर्दी डोळ्यासमोर येते. या ना त्या कारणांनी नागरिकांना तलाठी कार्यालयात जावेच लागते. परंतु, तलाठीच येत नसतील तर कामे होणार तरी कशी? त्यामुळे आता हेरवाड नागरीक "कोणी तलाठी देता का तलाठी', अशी मागणी नागरीकांकडून होत आहे.
हेरवाडमध्ये तलाठी कार्यालय आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून येथे पूर्ण वेळ तलाठी नाही. हेरवाडला पूर्ण वेळ तलाठी द्यावा, अशी मागणी होत आहे.
येथील रहिवाशांना सातबारा, फेरफार, सातबाऱ्यावर नाव लावणे, उत्पन्नाचा दाखला काढणे अशा विविध महसुली कामांसाठी तलाठी कार्यालयात जावेच लागते. परंतु, या कार्यालयाचा अतिरिक्त पदभार तेरवाड येथील तलाठ्यांकडे दिलेला आला होता मात्र हे तलाठीही आठवड्यातून दोनच दिवस येत होते किंवा येत पण नव्हते.
त्यानंतर शिरढोण येथील तलाठ्यांकडे चार्ज देण्यात आला, मात्र त्या तलाठ्यांनी अंतर जास्त होत असल्यामुळे हेरवाडला येण्यास नकार दिला असल्याचे समजते, या सर्व अडचणीमुळे गावामध्ये दिवाळी झाल्यापासून तलाठीच आला नसल्याची चर्चा गावात सुरु असल्याने नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
आमचे चाच्याच बरे...!
तलाठी कसा असावा याचे जीवंत उदाहरण म्हणजे हेरवाडचे तत्कालिन तलाठी आय.बी. मुल्ला (चाच्या) कोणाचेही काम असो विना विलंब न रोखता सर्व सामान्यांची कामे तात्काळ होत होती. इतकेच नव्हे तर महापूरातील पंचनामा आणि कोरोना काळातील काम मुल्ला चाच्यांनी अगदी उत्कृष्ठपणे केले होते. मात्र आय.बी.मुल्ला यांची निवृत्ती झाली. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यापासून कायमस्वरुपी गावाला तलाठी नसल्याने ग्रामस्थांची शासकीय उताऱ्यासाठी मोठी धावपळ सुरु आहे . त्यामुळे आपले 'चाच्याच' बरे होते, अशी प्रतिक्रिया उमटत आहेत.
