सुरेश कांबळे/ शिवार न्यूज नेटवर्क :
नैसर्गिक आपत्तीमुळे शेतमजूर ,शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत असून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी, शिरोळ तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा , हेक्टरी ७५ हजार रुपये मदत द्यावी, मजुरांसाठी विशेष अनुदान जाहीर करावे. शेतकरी हिताचे व्यापक धोरण केंद्र सरकारने राबवावे. अशा मागणीचे निवेदन शिरोळ तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने शिरोळ 'तहसील' कार्यालयास बुधवारी देण्यात आले.
दरम्यान, काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदार डॉ अपर्णा मोरे - धुमाळ यांना शिष्टमंडळाच्यावतीने निवेदन देण्यात आले, यावेळी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष सर्जेराव शिंदे, जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन बागे,काँग्रेस पक्षाचे युवक तालुकाध्यक्ष रमिजराजा जमादार, दत्त कारखाना संचालक दरगु गावडे, योगेश पुजारी, महेश परीट ,शंकर कांबळे, संदीप हवालदार यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. शेतकरी जगला तर देश जगेल, परंतु परतीच्या पावसाने राज्यातील शेती व शेतपीकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी प्रचंड हवालदिल झालेला आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करीत आहेत. असे असताना सध्या राज्यातील ई.डी. सरकार शेती पिक नुकसानीचे साधे पंचनामेही करायला तयार नाहीत. खरेतर शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची गरज आहे. मात्र राज्य सरकार केवळ टी व्ही वर दिसत आहे. याबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत रूपाने दिलासा द्यावा असे निवेदनात म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा