इसाक नदाफ/ शिवार न्यूज नेटवर्क
एक रक्कमी एफआरपी साठी प्रसंगी रक्त सांडू पण मागे हटणार नाही, उसाचे अर्धा- पाव टन वजन वाढावे यासाठी शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना उन्हातानात कांड्या गोळा करायला लागतात. मात्र, साखर कारखानदार सहजपणे काटा मारी करून कोट्यावधींचा दरोडा घालत आहेत. या काटा मारणाऱ्यांचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही असा इशारा स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. स्वाभिमानी युवा आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना दत्तवाड यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या जागर एफआरपी ची जाहीर सभेमध्ये शेट्टी बोलत होते. शेट्टी पुढे म्हणाले, ऊस वजनात साखर कारखान्यांकडून काटामारी सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या साखर चोरणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाळी एकजूट व्हावे. वाढत्या महागाईनुसार ऊस दरात वाढ झालेली नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. सध्याच्या राजकर्त्यांची भूमिका नेहमीच शेतकरी विरोधी राहिली आहे. शेतकऱ्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी संघटित व्हावे. अद्याप कोट्यावधी रुपयांची एफआरपी थकीत आहे. जोपर्यंत ही थकबाकी मिळत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रातला एकही साखर कारखाना चालू होऊ देणार नाही. एफआरपी अधिक दोनशे रुपये हे देणे अगोदर भागवा आणि मग कारखाने चालू करा. गतवर्षीचे दोनशे रुपये कारखानदारांच्या छाताडावर बसून घेऊ असा इशाराही शेट्टी यांनी यावेळी दिला व १५ ऑक्टोबरला होणाऱ्या ऊस परिषदेसाठी शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन ही त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना केले.
प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक जालंदर पाटील म्हणाले, आम्ही फुकट मागत नाही, तर घामाचे दाम मागतोय. साखर उद्योगाने व शासनाने एकदा एकत्र बसून इथेनॉलचे धोरण निश्चित करावे. या देशाला ८२ टक्के इंधन हे बाहेरून आयात करावे लागते. सध्या १३२ देशांमध्ये दुष्काळाचे क्षेत्र आहे. येणारा काळ हा साखरेच्या बाजारपेठेला सुवर्णकाळ असणार आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी संदीप जगताप (प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना), शैलेश आडके (तालुका अध्यक्ष स्वाभिमानी पक्ष), रामआण्णा शिंदे (तालुका अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना) मिलिंद साखरपे, पैलवान विठ्ठल मोरे आदींनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी बंडू पाटील (तालुका अध्यक्ष स्वाभिमानी युवा आघाडी), विशाल चौगुले सरपंच अकिवाट) त्याचबरोबर स्वाभिमानी युवा आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी बाधंव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत प्रकाश मगदूम यांनी तर प्रस्तावना विवेक चौगुले यांनी केले.
भर पावसातही सभा गाजली
- राजू शेट्टी शेतकऱ्यांना संबोधित करण्यासाठी व्यासपीठावर उभे राहताच पाऊस सुरू झाला. शेट्टी बोलायला लागले व पावसाचा जोर वाढला. पावसाळी सभेत राजू शेट्टींनी शेतकऱ्यांना संबोधित केले आणि त्याला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
