जांभळी / शिवार न्यूज नेटवर्क :
लंपी त्वचारोगाच जनावरांमध्ये प्रादुर्भाव वाढत असून तालुक्यातील जांभळी हरोली गाव परिसरात असलेल्या गोठ्यामधील रविवारी चार गाईंचा मृत्यू झाला या गोठ्यांना सोमवारी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव शिंदे यांना सोबत घेऊन भेट दिली व सविस्तर माहिती घेतली, या परिसरातील जवळपास 40 गाईंना लंपी या संसर्गजन्य रोगाची लागण झालेली आहे,
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत या गाईंवर सध्या उपचार सुरू असून मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या चार गाईंचा रविवारी मृत्यु झाल्याचे भेटी दरम्यान शेतकऱ्यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना सांगितले, शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सुरू असलेल्या लसीकरणामुळे रोगाच्या प्रादुर्भावाला आळा बसत आहे असे सांगताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी लसीकरणाची गती वाढवा आणि बाधित झालेल्या जनावरांवर तातडीने उपचार सुरू करा असे आदेश तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.
लंपी मुळे मृत्युमुखी पडलेल्या जनावरांचा विस्तृत अहवाल पशुसंवर्धन विभागाने तातडीने शासनाला सादर करावा जेणेकरून संबंधित शेतकऱ्यांना शासनाकडून जाहीर झालेली आर्थिक मदत तातडीने मिळणे सोयीचे होईल असेही आमदार यड्रावकर यांनी यावेळी सांगितले, शरद साखर कारखान्याचे संचालक संजय बोरगांवे, यड्राव को-ऑपरेटिव बँकेचे संचालक भरत चौगुले, कोल्हापूर जिल्हा सूतगिरणीचे संचालक प्रकाश लठ्ठे, शांतिनाथ पाटील आदी उपस्थित होते.
