Top News

आधार अपडेट शासनाचे काम : खंडेराव जगदाळे



सैनिक टाकळी / शिवार न्यूज नेटवर्क :

इयत्ता पहिली ते बारावी अखेर सर्व विद्यार्थ्यांचे स्टुडन्ट पोर्टल वरती आधार अपडेटेशन करण्याचे काम शाळास्तरावरती सुरू झालेले आहे. या साईटमध्ये असणाऱ्या तांत्रिक बाबींचा विचार करता शिक्षकांना विद्यार्थ्यांचे अपडेट करताना जीव मेटाकुटीस येत आहे. विद्यार्थ्यांचे आधार अपडेट होऊन देखील पुन्हा त्यांचे नाव मिस मॅच मध्ये दिसत असल्याने अनेकांनी या साइट वरती शंका उपस्थित केलेली आहे . याबाबतीत शासन स्तरावरती विचार करण्यात यावा अन्यथा शिक्षकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार असल्याचे मत महाराष्ट्र राज्य कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी व्यक्त केले आहे. गेल्या शैक्षणिक वर्षांमध्ये सर्व शाळांनी 100% विद्यार्थ्यांचे अपडेट करून त्याबाबतचा अहवाल खात्याकडे सादर केला असताना देखील अनेक शाळांचा रिपोर्ट पाहता सांख्यिकीक माहिती जुळत नसल्याचे दिसून येत आहे . कोरोना महामारी मुळे मागील दोन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे .या विद्यार्थ्यांना शालेय प्रवाहात आणत असताना शिक्षकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आता आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवु द्या असे म्हणण्याची वेळ शिक्षकावरती येऊन ठेपली आहे. शिक्षकावरती अशैक्षणिक कामाचा बोजा कमी करुन गुणवत्ता वाढीसाठी वेळ मिळावा याबाबतचे नियोजन करावे असे आवाहन जगदाळे यांनी केले आहे.

थोडे नवीन जरा जुने