Top News

ग्रामसेवकांच्या खातेनिहाय चौकशीसाठी खिद्रापूर येथे उपोषण


खिद्रापूर / शिवार न्यूज नेटवर्क :

 खिद्रापूर ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक  यांनी घरकुलचा लाभ देण्यासाठी आर्थिक सहाय्य करणाऱ्या संस्थेला 95 हजार रुपये द्यावे लागणार असल्याचे सांगत 35 हजार रुपये घेतल्याचा गंभीर आरोप गणेश पाखरे यांनी करत ग्रामसेवक यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना बडतर्फ करावे यामागणीसाठी आमरण उपोषणाला सुरवात केली आहे.

      खिद्रापूर ग्रामपंचायती समोर घरकुल प्रश्नी तत्कालीन ग्रामसेवक  यांना बडतर्फ करावे.आणि घरकुल मंजूर करावे यासाठी गणेश नामदेव पाखरे यांनी आंदोलन सुरू केले असून आंदोलनाचा आज शनिवार तिसरा दिवस आहे.

      दरम्यान ग्रामपंचायतीने गणेश पाखरे यांना मागणी केलेल्या माहिती अधिकाराखाली वेळोवेळी माहितीचा पुरवठा केला असताना प्रशासन व लोकप्रतिनिधींची बदनामी करण्याच्या हेतूने उपोषण करण्याची धमकी दिली आहे. तरी आपले आंदोलन स्थगित करावे अन्यथा शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची नोटीस ग्रामसेवक आप्पासाहेब मुल्ला यांनी दिले आहे.

 यावेळी बोलताना पाखरे म्हणाले महापुरात पडझड झालेल्या घरांची दुरुस्ती करण्यासाठी एका सामाजिक संस्थेने खिद्रापूरला दत्तक घेत 70 घरे बांधून देण्यासाठी जिल्हा परिषदेशी करार केला या कामकाजाच्या पाहणीसाठी तत्कालिन ग्रामसेवक यांची नियुक्ती केली.शासनाकडून प्राप्त झालेले 95 हजार संस्थेला स्वखुषीने द्या तुम्हाला घरकुलचा लाभ देतो असे सांगत  त्यांनी 35 हजार रुपये स्विकारुन 60 हजाराचे बांधकाम फौंडेशन करून घ्या असे सांगितले.

        मात्र या कामकाजात राजकीय हस्तक्षेप झाल्याने राजकीय सुडातून मला घरकुलच्या लाभापासून वंचित ठेवले आहे. याबाबत लोकशाही दिनादिवशी कोल्हापूर येथे अर्ज केला असता सदरचा अर्ज कार्यवाहीसाठी सध्याचे ग्रामसेवक आप्पासाहेब मुल्ला यांच्याकडे पाठवला असताना त्यांनी तो अर्ज दडपुन ठेवत आमच्यावर अन्याय केल्याचे पाखरे यांनी सांगितले. ग्रामसेवक यांना याप्रकरणात कर्तव्यात कसूर केली म्हणून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी करत येत्या दोन दिवसात कार्यवाही न झाल्यास ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या टाकीवर आंदोलनाला सुरुवात करणार असल्याचा इशारा दिला आहे.

थोडे नवीन जरा जुने