Top News

हेरवाड पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात राबविणार : नामदार हसन मुश्रीफ

 हेरवाडच्या पदाधिकाऱ्यांचा नामदार हसन मुश्रीफ, यशोमती ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क : 

हेरवाड ग्रामसभेने विधवा प्रथा बंद करण्याच्या क्रांतिकारी निर्णयाची राज्यातील मंत्रिमंडळाकडून दखल घेतली जात आहे. आज गुरुवारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर व खासदार सुप्रिया सुळे यांनी हेरवाडचे सरपंच सुरगोंडा पाटील आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा मुंबई येथे सत्कार केला. तसेच हेरवाड पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यासाठी ३१ मे रोजी होणाऱ्या अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक ग्रामपंचायतीला परिपत्रक काढून हा कायदा अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. त्यामुळे हेरवाड गावाने सुरु केलेल्या अभियानाला यश मिळत आहे.

४ मे रोजी झालेल्या गाव सभेत हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंदचा ऐतिहासिक ठराव केला, आणि या ऐतिहासिक निर्णयाची दखल थेट मंत्र्यांनी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे, राज्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी या निर्णयाची दखल घेऊन हेरवाडचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. इतकेच नव्हे तर डॉक्टर राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी या निर्णयाबद्दल हेरवाड गावाला 50 लाख रुपयांचा निधी जाहीर केला तसेच उपसभापती नीलम गोऱ्हे यांनीही महिलांच्या विकासासाठी 11 लाखांचा निधी जाहीर केला. 

दरम्यान राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर व ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही आज गुरुवारी हेरवाड ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना मुंबई येथे बोलवून त्यांच्याबरोबर सविस्तर चर्चा केली. यावेळी बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या, विधवा महिला संदर्भात असलेले धोरण अजून अर्धवट आहे, त्यामध्ये बदल करून विधवा महिला प्रथा बंदसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तर नामदार हसन मुश्रीफ म्हणाले, हेरवाड गावाने घेतलेला हा निर्णय खरोखरच कौतुकास्पद आहे. या निर्णयामुळे विधवा महिलांना न्याय मिळणार आहे. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये करण्यासाठी परिपत्रक काढले जाणार असल्याचे सांगितले. 



यावेळी सरपंच सुरगोंडा पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व गावातील पदाधिकारी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने