Top News

हेरवाडमध्ये अमृता सुतार व सायली ईटाज यांचा सत्कार


 हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

नायब तहसिलदार अमृता सुतार व मुंबई पोलिस दलात नुकतीच भरती झालेली सायली ईटाज या दोन मुलींनी हेरवाड गांवच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. अत्यंत गरीब परिस्थितीत शालेय शिक्षण घेवून उच्च पदापर्यंत या मुलींनी मजल मारली असून या मुलींचा आदर्श इतर मुलींनी घेवून गांवचे नांव उज्वल करावे, असे प्रतिपादन हेरवाड गांवचे लोकनियुक्त सरपंच सुरगोंडा पाटील यांनी केले.

शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथे सुतार बंधूंच्या वतीने नायब तहसिलदार अमृता सुतार तसेच मुंबई पोलिस दलात निवड झालेली सायली ईटाज यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी सरपंच पाटील बोलत होते. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक अझहर मुल्ला यांनी केले.

यावेळी बोलताना डॉ.अविनाश सुतार म्हणाले, अमृता सुतार व सायली ईटाज या मुलींनी अत्यंत गरीब परिस्थितीचा सामना करुन मोठ्या पदावर पोहचल्यामुळे हेरवाड गांवचे नांव दुरवर पोहचले आहे. गरीब परिस्थितीत या मुलींनी मिळविलेले यश हे खरोखरच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नायब तहसिलदार अमृता सुतार व मुंबई पोलिस दलात निवड झालेली सायली ईटाज यांचा सत्कार करण्यात आला.

 सत्काराला उत्तर देताना अमृता सुतार म्हणाल्या, गावातील विद्यार्थ्यांनी गरीब परिस्थितीकडे पाहत न बसता फक्त आपल्या ध्येयाकडे आपले लक्ष केंद्रीत करावे, यश नक्कीच मिळते. येथील ग्रामस्थांच्या वतीने केलेला हा सत्कार नक्कीच आठवणीत राहिल. यावेळी सायली ईटाज म्हणाल्या, पालकांनी मुलगा व मुलगी असा भेदभाव न करता मुलींनाही पोलिस क्षेत्राबरोबर देशसेवा करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, जेणेकरुन मुलीही आत्मनिर्भर बनतील. यावेळी उपसरपंच विकास माळी, माजी सभापती सुवर्णा अपराज, प्रथमेश पाटील, अजित अकिवाटे, सुनिता आलासे आदी यांच्यासह पदाधिकारी व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने