Top News

विद्यार्थ्यांच्या स्वयंशिस्तीसाठी राष्ट्रीय छात्र सेनेचे शिबिर आवश्यक सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांचे प्रतिपादन


प्रा. अमोल सुंके / शिवार न्यूज नेटवर्क : 

समाजात सुसंस्कार रुजविण्यासाठी विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या चरित्रांचे वाचन करणे आवश्यक आहे.तर समाजातील घातक रूढींना मूठमाती देऊन मानवतेचा मळा फुलवण्यासाठी सामूहिक प्रयत्न केला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या जीवनात स्वयंशिस्त येण्यासाठी राष्ट्रीय छात्र सेनेच्या शिबिरांंची आज काळाची गरज आहे. असे प्रतिपादन येथील पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे यांनी केले.

    कोल्हापूर येथील 56 महाराष्ट्र बटालियन यांच्यावतीने येथील सहकार भूषण एस.के. पाटील महाविद्यालयात गेली सात दिवस सुरू असलेल्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या शिबिराच्या सांगता समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय. एम. चव्हाण होते.

ते पुढे म्हणाले की, शिबिरातून सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात. यातून विद्यार्थ्यांनी आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे. राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी छात्र सेनेची वर्दी अंगावर घातल्यानंतर त्यांनी स्वयंशिस्त पाळली पाहिजे. ज्यावेळी आपण समाजात वर्दीवर जातो त्यावेळी वर्दीचा मान, शान राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या वयात राष्ट्रीय छात्र सेनेचे निवड केली. त्यामुळे ते कौतुकास पात्र आहेत. छात्र सेनेमुळे स्वतःला शिस्त लावून घेता येते. अनेक विद्यार्थी लष्करी व पोलीस भरतीसाठी प्रयत्न करतात. कोणतीही नोकरी कमी जास्त नसते. प्रत्येकाची कुवत, शारीरिक, मानसिक, मानसिक क्षमता आहे त्याच्या क्षमतेनेच आपल्याला नोकरी मिळत असते. चांगल्या पदावर जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करीत केला पाहिजे.

  अध्यक्षपदावरून बोलताना प्राचार्य, डॉ. वाय. एम. चव्हाण म्हणाले की, राष्ट्रीय छात्र सेनेच्या शिबिरातून विद्यार्थ्यांना कौशल्याची जाण झाली असून यातून कोणत्या क्षेत्रात जाणार याची माहिती मिळाली आहे. पोलिस व लष्करी सेवा म्हणजेच देशसेवा नव्हे तर कोणत्याही क्षेत्रात गेला की देशाच्या किंवा समाजाच्या उन्नतीसाठी काम करत असाल तर ती देशी ठेवाच असेल. शालेय जीवनात पुस्तके वाचनाची सवय लावून घेतली पाहिजे. पुस्तकासारखे ज्ञान देणारे दुसरे कोणतेही साधन नाही. जितकी पुस्तके वाचाल तेवढी जास्त वैचारिक व मानसिक पातळी वाढेल. पुस्तके वाचून प्रश्न सोडवायचे असतात मात्र पुस्तके न वाचता परीक्षेला गाईड किंवा पॉकेट स्टडीचा कॉपीसाठी विद्यार्थी सर्रास वापर करतात. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात गैरकृत्य होणार नाही यासाठी स्वयंशिस्त राखणे गरजेचे आहे.

प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक छात्र सेना ऑफिसर ए.डी. जाधव यांनी केले. सपोनि बालाजी भांगे यांचा सत्कार प्राचार्य डॉ. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय छात्र सेनेचे ऑफिसर बाबासाहेब भुजूगडे यांनी तर आभार व्ही. एस. थोरात यांनी मानले.

    या कार्यक्रमाला बटालियनचे सुभेदार सुरेश अडसूळ, लेफ्टनंट विराज थोरात,आनंद पुजारी या मान्यवरांसह श्रीदत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाड, सहकार भूषण एस. के. पाटील महाविद्यालय कुरुंदवाड, एस .पी .हायस्कूल कुरुंदवाड, पद्माराजे हायस्कूल शिरोळ, येथील राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थ्यांनी, विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.



थोडे नवीन जरा जुने