Top News

निवडणूक विधान परिषदेची, चर्चा मात्र उत्तम पाटलांची..!

 

प्रचाराचा धुरळा : विधान परिषदेत तीनही उमेदवारांनी कसली कंबर

अजित कांबळे/ शिवार न्यूज निपाणी :


   गेल्या चार दिवसापासून बेळगाव विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रचाराचा धुरळा उडाला आहे. शुक्रवारी (ता. १०) मतदान होणार असल्याने तीन दिवस मतदानाला शिल्लक राहिले आहेत. निवडणुकीच्या रणांगणामध्ये काँग्रेसचे चन्नराज हट्टीहोळी, भाजपचे महांतेश कवटगीमठ आणि अपक्ष उमेदवार लखन जारकिहोळी यांच्यामध्ये चुरस होणार आहे. त्यामुळे ही निवडणूक तिरंगी असल्याने सर्वांनीच चांगली कंबर कसली आहे. आतापासूनच भेटवस्तू व रोख रक्कमेचे आमिष दाखविले जात आहे. निपाणीजवळील स्तवनिधी येथे अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी यांच्या प्रचारासाठी युवा नेते उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेले शक्तिप्रदर्शन म्हणजेच 'निवडणूक विधान परिषदेची आणि चर्चा युवा नेते उत्तम पाटलांची' अशी चर्चा निपाणी शहर व परिसरात रंगली आहे. भाजप व काॅंग्रेसकडूनही या निवडणुकीतून विधानसभेचा कानोसा घेतला जात आहे.

जारकिहोळी यांच्या उमेदवारीमुळे विधान परिषद निवडणुकीमध्ये रंगत आली असून दोन्ही उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. युवा नेते उत्तम पाटील यांनी अपक्ष उमेदवार लखन जारकिहोळी यांच्या प्रचारार्थ निपाणी मतदारसंघातील मतदार आणि कार्यकर्त्यांच्या सभेत स्तवनिधीमध्ये केलेल्या शक्तीप्रदर्शनामुळे निवडणूक विधान परिषदेची चर्चा मात्र उत्तम पाटील यांची सुरु झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ही प्रचार सभा २०२३ मध्ये होणाऱ्या विधानसभेची साखर पेरणीच ठरते की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. निपाणी तालुक्यातील बहुतांश ग्राम पंचायतींमध्ये २०२० मध्ये सत्तांतर घडवून आणण्यासाठी बोरगाव येथील उत्तम पाटील यांनी मरगळलेल्या कार्यकर्त्यांना बळ दिले. त्यामुळे याचा फायदा निश्चितच या निवडणुकीसाठी होताना दिसणार आहे. 

          निवडणुका आल्या की नुसता कार्यकर्त्याना हात जोडून चालत नाही तर त्यांच्या हातांना काम द्यावे लागते. ते काम आम्ही अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून केले असल्याचे त्यानी म्हटले आहे. सध्या तरी उत्तम पाटील अपक्ष उमेदवाराचा प्रचार करत आहेत. शिवाय जारकीहोळी हाच आपला पक्ष असल्याचे सांगितले आहे. विधानसभेला अध्याप बराच अवधी आहे. त्यामुळे उत्तम पाटील निवडणूक लढवतात का? जर लढवलेच तर ते कोणत्या पक्षातून की अपक्ष? या सारख्या प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काळात दडली आहेत. त्यामुळे विधान परिषद निवडणूक उत्तम पाटील यांच्यासाठी खूप महत्वाची आहे. उत्तम पाटील यांच्या बरोबरच त्यांचे ज्येष्ठ बंधू अभिनंदन पाटील हे सुद्धा रात्र-दिवस झटताना दिसत आहेत. 

भाजप उमेदवार महांतेश कवटगीमठ यांच्या प्रचारार्थ धर्मादाय, वक्फ व हाज मंत्री शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनीही वेग घेतला आहे. त्यांनी मतदार संघाचा कानोसा घेण्याचा प्रयत्न चालविला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारी म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात असल्याने त्यादृष्टीने तयारी चालल्याचे चित्र आहे.

काॅग्रेसच्या गोटातही विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर हालचाली गतिमान झाल्या आहेत. माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी मंत्री वीरकुमार पाटील,माजी आमदार सुभाष जोशी, चिक्कोडी जिल्हा काॅंग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांच्यासह अन्य नेतेमंडळी विधान परिषदेच्या निवडणुकीत काॅंग्रेसचे उमेदवार चेन्नराज हट्टीहोळी यांच्या विजयासाठी मतदारांना खेचण्यासाठी प्रयत्नशील आहेत. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ते देखील तयारी करीत असल्याचे चित्र दिसत आहे.

       युवा नेते उत्तम पाटील यांनी निपाणी मतदारसंघातील केलेली विकास कामे व अरिहंतच्या माध्यमातून वाढता जनसंपर्क यामुळे निवडणूक विधानपरिषदेची, चर्चा उत्तम पाटीलांची असे वातावरण सर्वत्र पहावयास मिळत आहे. 


थोडे नवीन जरा जुने