हेरवाड/शिवार न्यूज नेटवर्क:
हेरवाडमध्ये गाई, म्हशी, शेळ्या आणि मेंढ्या असे पशुधन मोठ्या प्रमाणात असून, त्यांना वेळोवेळी करावे लागणारे लसीकरण आणि उपचारांसाठी लोकांना मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण होत आहे. जनावरांवरील वैद्यकीय उपचारांसाठी डॉक्टर उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक वेळा जनावरे दगावण्याचेही प्रकार झाले आहेत. हेरवाड येथे पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून एच.एस. चव्हाण यांची नियुक्ती असून सुद्धा ते एकही दिवस गावात फिरकत नसल्याने या विरोधात सदरचे पशुवैद्यकीय अधिकारी हेरवाड येथे आल्याचे दाखवावे व पाच हजार रुपये बक्षीस मिळवावे असे अनोखे बक्षीस हेरवाड येथील सामाजिक कार्यकर्ते जीवन कांबळे यांनी ठेवले आहे.
यावेळी बोलताना जीवन कांबळे म्हणाले, ऐनवेळी शेळ्या, मेंढ्या अथवा इतर जनावरांना उपचार करण्यासाठी येथील ग्रामस्थांना खासगी डॉक्टरांना बोलावून घ्यावे लागते. तेही वेळेत उपलब्ध होतीलच असे नाही. गेल्या अनेक वर्षात येथील धनगर समाजातील मेंढपाळांच्या मेंढ्या अज्ञात आजाराने दगावल्या आहेत. त्यामुळे हजारो नुकसान झाले आहे. इतकेच नव्हे तर लाळखुरकत आजार आता डोके वर काढत आहे. अशातच हेरवाड मध्ये सदरचे पशुवैद्यकीय अधिकारी फिरकत नसल्याने गावातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. हेरवाड येथील सांस्कृतिक भवन येथे पशुवैद्यकीय केंद्र आहे. गेल्या काही वर्षापूर्वी या केंद्रात मुदतबाह्य औषधांचा साठा सापडला होता. याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बंडू पाटील यांनी पर्दाफाश केला होता. त्यामुळे सध्याही या पशुवैद्यकीय केंद्राबाबत शंका उपस्थित होत असून या केंद्रात सध्या मुदतबाह्य औषधांचा साठा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदरच्या पशुवैघकीय डॉक्टरची चौकशी करून या दवाखान्याची तपासणी करावी, अशी मागणी जीवन कांबळे यांनी केली आहे.