Top News

कौटुंबिक वादातून शिरोळमध्ये खुनी हल्ला; दोघांवर गुन्हा

शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

येथील राजीव गांधीनगर परिसरात कौटुंबिक वादातून एका तरुणावर खुरप्याने खुनी हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी शिरोळ पोलीस ठाण्यात सागर आनंदा नंदीवाले आणि विशाल आनंदा नंदीवाले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, रमेश संभाजी नंदीवाले (वय ३०) यांनी शिरोळ पोलिसात फिर्याद दिली आहे. 

पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल आनंदा नंदीवाले हा फिर्यादीच्या वहिनीला फोन करून विनाकारण त्रास देत होता. याबद्दल जाब विचारण्यासाठी फिर्यादी रमेश नंदीवाले आणि त्यांचा भाऊ मुत्ताप्पा हे शनिवारी ९ मे सकाळी ६ च्या सुमारास आरोपीच्या घरासमोर गेले होते. यावेळी झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. वादावादी सुरू असताना आरोपी सागर आनंदा नंदीवाले याने घरातून खुरपे आणले, तर विशाल नंदीवाले याने लाठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत असताना सागर नंदीवाले याने रागाच्या भरात फिर्यादी रमेश यांच्या छातीवर डाव्या बाजूस खुरप्याने गंभीर वार करून त्यांना जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हल्ल्यानंतर रमेश नंदीवाले यांनी शिरोळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. सागर आनंदा नंदीवाले आणि विशाल आनंदा नंदीवाले या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास शिरोळ पोलीस करत आहेत.

थोडे नवीन जरा जुने