जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
मद्यप्राशन करून मिक्सर ट्रक वेडेवाकडे चालवत इतरांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या चालकाविरोधात जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. २४) रात्री उदगाव चौक येथे घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आरोपी अब्दुल काशीद मुजावर (वय ३१, रा. कोंडीग्रे, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) हा त्याच्या ताब्यातील मिक्सर ट्रक (एमएच १२ एमव्ही ३१२४) हे वाहन मद्यप्राशन करून भरधाव व वेडेवाकडे चालवत होता. कोल्हापूर ते सांगली मुख्य मार्गावरील उदगाव चौक येथे रात्री सुमारे १२.१५ वाजण्याच्या सुमारास ही घटना निदर्शनास आली.
यावेळी रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या इतर नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याचे लक्षात आल्यानंतर जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल शुभम महादेव घाटगे (बकल नं. ८३२) यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली. त्यानुसार आरोपीविरोधात जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. १९२/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल कांबळे करीत आहेत.
