Top News

श्री पंत महाराज मंदिरात समितीतर्फेसात दिवसीय पारायण सोहळा संपन्न


 कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

      कुरुंदवाड येथील श्री पंत महाराज मंदिरात समितीतर्फे आरती पारायण,भजन,कीर्तन,रक्षाबंधन, दहीहंडी,पालखी सोहळा आणि महाप्रसाद असा सात दिवसीय पारायण सोहळा संपन्न झाला.शहरातील नवविवाहित आणि भक्त-गणांच्या हस्ते हे कार्यक्रम पार पडले.

       कुरुंदवाड येथील भैरववाडी येथे श्रीपंत बाळेकुंद्रीकर महाराजांचे बैठक स्थान होते. या ठिकाणी महाराजांनी आपला मोठा कालावधी घालवला आहे. तर हलसिद्धनाथ मंदिर परिसरातही त्यांचे भक्तांनी मोठे मंदिर उभे केले आहे.जन्मकाळ सोहळ्या निमित्त प्रत्येकवर्षी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.

      देशात महिला-मुलींच्यावर होत असलेल्या अत्याचाराला समूळ नष्ट करणे गरजेचे आहे.समाजात भय निर्माण झाले आहे.हे भय निर्भय व्हावे यासाठी मंदिर समितीने एक पाऊल पुढे टाकत रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेऊन युवा पिढीला आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवले आहे.सात दिवसीय पारायण सोहळ्यात श्री.पंत भजनी मंडळ,गुरू माऊली भजनी मंडळातर्फे भजनाचे कार्यक्रम तर निशाताई फाटक यांच्या भक्ती-भाव गीतांचा कार्यक्रम,बालकांची दहीहंडी,महिलांचा हळदी-कुंकू कार्यक्रम असे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.शहरातील नवविवाहित जोडप्यांच्या हस्ते आरती व धार्मिक मान्यवरांच्या हस्ते पारायण संपन्न झाले.

         मंगळवारी मंदिरातून पालखी मिरवणुकीला सूरवात झाली.काळाराम मंदिर,शाकंभरी मंदिर,दौलतशहा दर्गा,पालिका हनुमान मंदिर या मंदिरांना भेटी देत बाजार-पेठेतून मिरवणूक मंदिरात आल्यानंतर समारोप करण्यात आला.बुधवारी सकाळी महप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

              प्रवीण खबाले,उमेश बागडी,प्रवीण चव्हाण,तानाजी आलासे,बापूसाहेब म्हावळे,संदीप सावगावे,आण्णासाहेब चव्हाण यांच्यासह आदी भक्तजणांनी पारायण सोहळा यशस्वी केला.


थोडे नवीन जरा जुने