शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील ग्रामपंचायत लगत असणाऱ्या नंदगावे किराणा स्टोअर्सच्या शटर्सचे कुलूप तोडून दुकानातील रोख रक्कम २८ हजार रुपयांची चोरी झाल्याची घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. याबाबत दुकान मालक चैतन्य संजय नंदगावे यांनी शिरोळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी की, श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील ग्रामपंचायतलगत चैतन्य नंदगावे यांचे किराणा मालाचे दुकान आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला व काउंटरमध्ये ठेवलेली २८ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल काळेल करीत आहेत.
