Top News

शिरोळ तालुक्यात रंगपंचमी उत्साहात साजरी

शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

लाल, पिवळा, गुलाबी, निळा अशा रंगांची मुक्त उधळण, ओळखू न येणारे चेहरे, सकाळपासून हातात रंग आणि भरलेली पिचकारी घेऊन एकमेकांना रंगवण्यात गुंतलेली बच्चेकंपनी, कुटुंबातील मुले, नातवंडांसोबत रंगून गेलेले आबालवृद्ध, मैत्रीच्या नात्याला रंगांनी अधिक गहिरे करणाऱ्या युवक-युवतींसह अवघा शिरोळ तालुका शनिवारी रंगात न्हाला.

गरीब-श्रीमंत, लहान-मोठा असा भेद विसरायला लावणाऱ्या आणि मनामनातील कटुता आपल्या रंगांनी पुसून टाकणाऱ्या या दिवसाला सुरुवातच झाली बच्चेकंपनीच्या किलबिलाटाने सकाळी उठल्या-उठल्या हातात वेगवेगळे रंग घेऊन लहान मुलांनी एकमेकांना रंगवायला सुरुवात केली. दारात ठेवलेल्या बादलीतून पिचकारी भरून मित्र-मैत्रिणींना चिंब भिजवताना त्यांचा होणारा जल्लोष आणि गमती-जमती मोठ्यांनाही हसायला लावणाऱ्या होत्या. त्यांच्यासोबत रंग खेळताना मोठेही लहान झाले आणि मुलांना उत्साह दुणावला.

दरम्यान, शालेय आणि महाविद्यालयीन मुलामुलींनीही रंग खेळायला सुरुवात केली. एवढेच नव्हे तर रंगलेल्या चेहऱ्यांनी नातेवाईक आणि मित्रपरिवाराला रंगवण्यासाठी मुलं महिलांसोबत दुचाकीवरून जात होते.घरातली मोठी माणसं, गल्लीतल्या मित्र-मैत्रिणींना रंगवून झाल्यानंतर शहरात अन्य ठिकाणी राहत असलेल्या मित्र-मैत्रिणींना रंगवण्यासाठी युवक-युवती ग्रुपने दुचाकीवरून फिरत होते. वाटेत कोणी मित्र भेटले की त्यांना रंगवून पुढे जायचे. एरव्ही आपल्या लुकबद्दल अधिक जागरूक असलेले मुले-मुली वेगवेगळे रंग आणि पिवडीने नखशिखांत रंगून ओळखू न येणाऱ्या चेहऱ्यानिशी दुचाकीवरून सुसाट जाताना दिसत होते. याशिवाय विविध तरुण मंडळांनीही रंगपंचमीचे आयोजन केले होते.

थोडे नवीन जरा जुने