हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
शेतकरी सहकारी दूध व्यवसाय संस्थेच्या वतीने दूध पुरवठा करणाऱ्या २० सभासदांना मुऱ्हा जातीच्या म्हशींची खरेदी करुन देऊन सहकार क्षेत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे. या म्हैस खरेदीसाठी शेतकरी विकास संस्थेच्या वतीने कर्जपुरवठा करण्यात आला आहे. दरम्यान, या म्हैस वितरण कार्यक्रमाला गोकुळ दूध संघाचे संचालक अजित नरके व एस. आर. पाटील यांनी उपस्थित राहून शेतकरी उद्योग समूहाच्या कार्याचे कौतुक केले.
गावातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी अवघ्या तीन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या शेतकरी सहकारी दूध व्यवसाय संस्थेने नेहमीच दूध उत्पादक शेतकऱ्यांचे हित साधले आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी दिवाळीनिमित्त उच्चांकी बोनसचे वाटप करण्यात येते.
दरम्यान, ग्रामीण भागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीमुळे हरियाणा येथील मुऱ्हा जातीची म्हैस घेणे त्यांना परवडत नाही. मात्र, या कामी शेतकरी दूध उत्पादक सहकारी संस्थेच्या पुढाकाराने आणि शेतकरी विकास संस्थेच्या आर्थिक पाठबळ आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांचे स्वप्न साकार झाले आहे.
१ लाख ३० हजार रुपये प्रमाणे हरियाणा येथून २० मुऱ्हा जातींच्या म्हैशींची खरेदी करून नुकतेच शेतकऱ्यांना प्रदान करण्यात आले आहे.
यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक अजित नरके, एस. आर. पाटील, शेतकरी विकास संस्थेचे चेअरमन सुनिल माळी, व्हा. चेअरमन बापू बरगाले, शेतकरी सहकारी दूध व्यवसाय संघाचे चेअरमन पायगौंडा आलासे, व्हा. चेअरमन रवी इंगळे, दिलीप पाटील, उपसरपंच हयाचांद जमादार, सचिन पाटील, भरत पवार, अर्जुन जाधव, बाबुराव माळी यांच्यासह दोन्ही संस्थांचे सर्व संचालक सभासद व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
