शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
चंद्रपूर येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत महिला गटात शिरोळ येथील पैलवान कु अमृता शशिकांत पुजारी हिने महाराष्ट्र महिला केसरी किताब मिळवल्याबद्दल शिरोळ नगरपरिषद व शहरवासिय यांच्या वतीने पैलवान अमृता हिला मानपत्र , चांदीची गदा व आरोग्य विमा पॉलिसी देऊनगौ गौरविण्यात येणार आहे. सोमवारी २५ डिसेंबर सायंकाळी ६ वाजता पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व खासदार संजयकाका पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समारंभ होणार असून प्रसिद्ध कुस्ती निवेदक शंकर पुजारी हे समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत अशी माहिती शिरोळ नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव व शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष पैलवान रावसाहेब देसाई यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले , सोमवारी दुपारी ४ वाजता कु अमृता पुजारी हिचे शहरात आगमन होताच शिरोळ पंचायत समिती येथून सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे . त्यानंतर सायंकाळी ६ वाजता शिवाजी चौकात नागरी सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान खासदार संजयकाका पाटील हे भूषवणार असून खासदार धैर्यशील माने ,आमदार डॉ राजेंद्र पाटील - यड्रावकर , माजी खासदार राजू शेट्टी ,माजी आमदार उल्हास पाटील , दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील उपस्थित राहणार आहेत.
मुख्याधिकारी प्रचंडराव म्हणाले, महाराष्ट्र केसरी किताब मिळालेबद्दल पैलवान अमृत पुजारी हिच्या रूपानेशिरोळ शहरात प्रथमच भव्य समारंभ होत असून तिचे कौतुक करण्याकरता सर्व शिरोळवाशीयांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री प्रचंडराव व पैलवान रावसाहेब देसाई यांनी केले. शहरातील विविध तरुण मंडळाचे कार्यकर्ते कुस्ती क्षेत्रातील मान्यवर , शाळा महाविद्यालय मधील विद्यार्थी यासह अबालवृद्ध सहभागी होणार आहेत. या पत्रकार बैठकीस शिरोळमधील लोकप्रतिनिधी, सेवा संस्थांचे पदाधिकारी ,तरुण मंडळे , शाळा प्रतिनिधी , कुस्तीगीर परिषदचे पदाधिकारी उपस्थित होते .
