अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बोरगाव येथील ग्रामदैवत हजरत पीर बावाढंगवली गुलखा व हजरत पीर हैदरशा मदरशा यांचा उरूस बुधूवार 29 नोव्हेंबर 2023 ते शनिवार 2 डिसेंबर 2023 अखेर साजरा होत आहे. त्या निमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून शुक्रवार 1 डिसेंबर रोजी उरुसाचा मुख्य दिवस आहे त्यानिमित्ताने.
निपाणी तालुक्यातील बोरगाव हे दूधगंगा नदी काठावर वसलेले शहर. तालुक्यातील सदन गावांपैकी एक.शहराला बारा महिने वाहणाऱ्या दूधगंगा नदीचे वरदान आहे. ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील यांच्या सहकार व राजकीय क्षेत्रामुळे राज्यात नालोकिक मिळवलेले शहराची लोकसंख्या सुमारे 19 हजारांवर आहे.गावातील श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धेश्वर ,जैन बसदी, ज्योतिबा, हनुमान ,मातंगी, बिरदेव , वाशिकान, संतुबाई,यल्लमा ,महादेव थलोबा ,मल्लय्या, मारागुबाई देवांची मंदिर आहेत .त्यापैकीच बावाढंगवली दर्गा शरीफ हे ग्रामदैवत मानले जाते.
बावाढंगवली यांचे मूळ नाव अब्दुल वगळू आलिशा बावाढंग हे बगदाद देशातील काटारी येथील आहेत. सुमारे 511 वर्षांपूर्वी ते भारतात धर्मप्रसारासाठी आले होते .धर्मप्रचार करताना भारतात धर्मपालन व संस्कृतीचे मार्गदर्शन करीत असे. असे असताना बावाढंगवली एक दिवस इचलकरंजी हून बोरगाव कडे येत होते. याप्रसंगी पंचगंगा नदीला मोठा महापूर आला होता. बाबाढंगवली यांनी एका उडीत (ढेंगेत)नदी पार करून बोरगाव मध्ये आले .तेव्हापासून बाबांना बावाढंगवली असे नाव पडले.
बाबांचे शिष्य हैदरशा मदरशा यांनी बोरगाव परिसरात त्यांच्यासोबतच धर्मप्रचार केला. केवळ मुस्लिम समाज नव्हे तर समस्त मानव जातीचा कल्याणासाठी त्यांनी विश्व प्रार्थना केली .यानंतरच्या काळात बाबांनी बोरगाव येथे समाधी घेतली .कोल्हापुर येथील बाबू जमाल दर्गाह, पन्हाळगड येथील सय्यद खतश,रुकडी येथील राजेबागस्वार, हातकणंगले येथील गोरी बादशाह ,आळते येथील शरमस्तवली हे बाबांचे भाऊंचे दर्गा आहेत.
शिरदवाड तालुका शिरोळ येथे बाबांचा नदीकिनाऱ्यावर दर्गा आहे बोरगाव व शिरदवाड येथे एका दिवशी उरूस भरविण्यात येतो. सालाबाद प्रमाणे उर्दू तारीख शनिवार दिनांक 30 नोव्हेंबर रोजी गंधरात्र कुराणखणी आहे. त्या दिवशी त्यांचे शिष्य हैदरशा मदरशा यांनाही बाबांबरोबर प्रचार केल्याने यांनाही उरुस व गलेफाचा मान दिला जातो .1938 सा गावाच्या मध्यभागी दर्गाह घुमट बांधण्यात आला आहे. त्यानंतर लोक वर्णीतून सभा मंडप बांधण्यात आले. गेल्याच वर्षी लोकवणीसह लोकप्रतिनिधींच्या विशेष सहकार्याने मुसाफिरखाना बांधण्यात आला असून नगारखाण्याचे ही बांधकाम प्रारंभ करण्यात आले आहे.
बाबांच्या उर्सास बुधवार 29 नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे . बुधुवार 29 रोजी फराशी ,गुरूवार 30 रोजी गंधरात्र,कुराणखणी , दंडवत, शुक्रवार 1 डिसेंबर रोजी भर उरुस आहे. याच दिवशी गलिफ नैवेद्य कार्यक्रम आहे.
पुरस्काळात गंध लावण्याचा मान बाबासाहेब पाटील पोलीस पाटील या घराण्याला तर ,सरकार गलिफचा मान राजू मगदूम घराण्याला आहे. 1 डिसेंबर रोजी रात्री चांद कादरी व इंतजार चिस्ती यांचा कवाली चा भहारदार कार्यक्रम , खालील अहमद कव्वाल, व कमाल चिस्ती यांचाही कवालीचा जंगी मुकाबला होणार आहे.
शनिवार 2 डिसेंबर रोजी सकाळी उत्तम पाटील युवाशक्ती वतीने आयोजित भव्य जनरल बैलगाडी, एक बैल एक घोडा, तसेच घोडा गाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री झंकार कॉमेडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून युवा नेते उत्तम पाटील व उद्योजक अभिनंदन पाटील यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.
नगरपंचायत तर्फे शहरात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे .गटारी, रस्ते स्वच्छ करण्याबरोबर शुद्ध पाणी पुरवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. उरुस कमिटी व दर्गा कमिटी यांच्यावतीने दर्गा गोमूठावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सर्व जाती जमातीचे लोक एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने उरूस साजरा करीत असल्याने हा उरूस म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्याच्या प्रतीक होय.
