Top News

कोयत्याने हल्ला केल्याप्रकरणी आरोपीस एक वर्षे कैद


 जयसिंगपूर/ शिवार न्यूज नेटवर्क : 

किरकोळ कारणावरुन कोयत्याने हल्ला करुन फरार झालेला आरोपी तब्बल २४ वर्षानंतर सापडला. आसाराम धोंडीराम माळी ( वय ४५, रा. बीड) असे त्याचे नाव आहे. जयसिंगपूर येथील प्रथम वर्ग न्यायालयाने त्यास १ वर्ष कैद व १००० दंड व दंड न भरलेस पुन्हा ६ महिने कैद अशी शिक्षा सुनावली.

याबाबत अधिक माहिती अशी,आरोपी आसाराम धोंडीराम माळी याने दि. ५ डिसेंबर १९९६ रोजी भूपाल विठ्ठल माने (वय ५०, रा. दानोळी) यांच्यावर किरकोळ कारणावरून कोयत्याने हल्ला केला होता. दानोळी - जयसिंगपूर मार्गावर ही घटना घडली होती. या हल्ल्यात भूपाल माने हे जखमी झाले होते. या हल्ल्याच्या घटनेनंतर आरोपी आसाराम माळी हा फरार झाला होता. भूपाल माने यांच्या फिर्यादीनंतर जयसिंगपूर पोलिसांनी आसाराम माळी याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला होता. त्याच्याविरुध्द न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.दरम्यान आरोपी आसाराम माळी हा तब्बल २४ वर्षानंतर पोलिसांच्या जाळ्यात सापडला. त्यानंतर न्यायालयात खटल्याचे कामकाज सुरु झाले. फिर्यादी भूपाल माने, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार शिवाजी विठ्ठल माने, पंच अमोल अनिल कांबळे, डॉक्टर श्रीकांत पाटील, तपास अधिकारी सानप यांची साक्ष न्यायालयात नोंदवली. साक्षीदार यांचे जबाबातून व परिस्थिती वरून आरोपी याने गुन्हा केल्याचे सिध्द होते, हा विशेष सरकारी वकील सूर्यकांत मिरजे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून, न्यायालयाने आरोपी माळी यास शिक्षा सुनावली.

थोडे नवीन जरा जुने