दानोळी / शिवार न्यूज नेटवर्क :
महापुराची कारणे शोधणाऱ्या वडनेरे समितीने कृष्णा नदीत अडथळे निर्माण झाल्याने या भागात महापूर येत आहे असे कारण राज्य सरकार ला दिलेल्या अहवालात नमूद केले असताना अडथळे काढून महापुराची तीव्रता कमी करण्याऐवजी कणवाड तालुका शिरोळ येथे नव्याने ब्यारेज बांधून मोठा अडथळा निर्माण करण्याचा घाट राज्य सरकार ने घातला आहे त्या ब्यारेज मुळे भविष्यात शिरोळ तालुका उध्वस्त होणार असून त्याला नेटाने विरोध केला जाईल असे काल दानोळी येथील पूरमुक्ती जन संवाद यात्रेच्या जाहीर सभे प्रसंगी धनाजी चुडमुंगे यांनी मत व्यक्त केले. या चुकीच्या दिशेने सुरु असलेल्या विकासाला कारणीभूत असलेल्या पाटबंधारे मंत्र्याचा जाहीर निषेधही करण्यात आला.
पूरमुक्ती जन संवाद यात्रेचे स्वागत व प्रास्ताविक आंदोलन अंकुश चे जिल्हा उपाध्यक्ष उदय होगले यांनी 1 मे च्या पूर परिषदेचे आयोजना मागचा हेतू स्पष्ट करून दानोळी ग्रामपंचायत ने महापुरावर कायमस्वरूपी उपाय सरकार ने काढावा म्हणून सरकारशी पत्रव्यवहार करावा अशी विनंती उपस्थित लोकप्रतिनिधींना करण्यात आले.
या जन संवाद यात्रेच्या जाहीर सभेत आपल्या अध्यक्षीय भाषणात धनाजी चुडमुंगे यांनी 2005 ते 2021 पर्यंत 4 महापूर या भागात आले प्रत्येक वेळी पूर आल्यानंतर आपण नुकसान भरपाई अनुदान याबद्दल बोलतो मागण्या करत असतो पण आजपर्यंत आपण पूर का येतो व पूर येऊ नये म्हणून सरकार ने उपाय शोधावा म्हणून कधी मागणीच केली नाही त्यामुळे पुराची आपत्ती आपल्या मानगुटीवर बसली असून येथून पुढे आम्हाला सरकार ची मदत, नुकसान भरपाई नको पूरमुक्ती पाहिजे अशी मागणी सर्वांनी केली पाहिजे आणि त्यासाठी 1 मे ला कुरुंदवाड येथे पूर परिषद होणार आहे. सर्व ग्रामस्थांनी पूर परिषेदेला आल्यास शासन यावर विचार करेल आणि त्यातून पुरापासून कायमची मुक्ती मिळेल असे त्यांनी बोलून दाखवले.
यावेळी तालुकाध्यक्ष दिपक पाटील दिगंबर सकट यांची भाषणे झाली आभार जेष्ठ नागरिक मानाजी भोसले गुरुजी यांनी मानले.
यासभेस उप सरपंच विपुल भिलवडे, विजय दळवी, रोहित धनवडे पिंटू गावडे गणेश साळोखे शहराध्यक्ष दत्तात्रय जगदाळे राकेश जगदाळे अमोल गावडे हे उपस्थित होते.
सलग येणाऱ्या महापुरामुळे येथील ऊस क्षेत्र मोठया प्रमाणात बाधित होत आहे. हा पूर बाधित ऊस तोडण्यास कारखाने तयार नसल्याचे यावर्षी सर्व गावात दिसून आलेले आहे. यावर्षी आपल्या भागातील कारखान्यांनी पूर बाधित ऊसाच्या नोंदी नाकारण्यास सुरुवात केली असून या उसाच्या नोंदी न झाल्यास पीक कर्ज मिळण्यात अडचणी येण्याचा धोका असून आपण शेतकऱ्यांनी आताच सावध होऊन पूर येऊ नये म्हणून काम करणाऱ्या आंदोलन अंकुश ला साथ द्यावी असे आवाहन आंदोलन अंकुश चे जिल्हाध्यक्ष राकेश जगदाळे यांनी यावेळी केले.
