आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे प्रतिपादन
हेरवाड येथे शाहू पतसंस्थेच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
ग्रामीण भागातील पतसंस्था सर्वसामान्य जनतेला उभे करण्याचे काम करते. महापूर, कोरोना या सर्व परिस्थितीवर मात करून ग्रामीण भागातील पतसंस्थांनी सभासद व कर्जदारांचे विश्वास संपादन केले आहे. याच पावलावर पाऊल ठेवून राजश्री शाहू पतसंस्था वाटचाल करीत आहे. अशा याच संस्थांच्यामुळेच सहकार क्षेत्रात शिरोळ तालुक्याचे नाव कोल्हापूर जिल्ह्यात नव्हे तर राज्यात आदर्शवत ठरले आहे. असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.
राजर्षि शाहू नागरी पतसंस्था शाखा हेरवाडच्या नुतन वास्तुच्या उदघाटन प्रसंगी ना. यड्रावकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुरगोंडा पाटील होते. यावेळी सेफ डिपॉझिट लॉकर्सचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नामदार यड्रावकर पुढे म्हणाले, आपल्या राज्याला दिलेला शब्द पाळणारा मुख्यमंत्री लाभला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बरोबरच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांच्या अनुदानाची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. कोरांना काळात सरकारवर मोठा आर्थिक ताण होता, या परिस्थितीमध्येही महाविकास आघाडी शेतकरी, कष्टकरी यांच्यासाठी बाहेरून कर्ज उभे करून त्यांना मदत केलेली आहे. शाहू पत संस्थेबद्दल बोलताना ते म्हणाले, ग्रामीण भागातील जनतेचा आर्थिक कणा मजबूत करण्यासाठी शाहू पत संस्था गेल्या अनेक वर्षापासून वाटचाल करीत आहे. नैसर्गिक संकट काळात सभासदांच्या बरोबर कर्जदारांचा विश्वास संपादन करून ही संस्था आदर्शवत ठरली आहे. यापुढेही या संस्थेने आपल्या शाखा वाढवून अधिकाधिक सर्वसामान्य जनतेचा आर्थिक कणा मजबूत करण्याचे काम करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी रावसाहेब पाटील म्हणाले, सभासदांच्या विश्वासावर शाहू पत संस्था सहकार क्षेत्रात नावलौकिकाला आली आहे. सभासद, कर्जदार आणि कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे या संस्थेचा एनपीए ० टक्के आहे. यापुढेही या संस्थेने सहकार क्षेत्रात आपली घोडदौड कायम ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविक भाषणात दादासो पाटील म्हणाले, गेली २७ वर्षामध्ये सर्व सभासद, हितचिंतक व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून संस्थेची प्रगती सुरु आहे. आजपर्यंत सर्वसामान्य गोर-गरिब जनतेस सहकार्य करून त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. आज सर्वांच्या योगदानामुळे हेरवाड येथील संस्थेची शाखा स्वतः च्या वास्तुत कार्यरत झाली आहे. या पुढेही सर्व सभासदांच्या विश्वासाच्या बळावर हि संस्था वाटचाल करणार असल्याचे सांगितले.
यावेळी संस्थेचे सी. ए. एस.एस मुळे, सरपंच सुरगोंडा पाटील यांची मनोगते झाली. स्वागत चेअरमन किरण आलासे यांनी केले. यावेळी मुंबई पोलिस दलात निवड झाल्याबद्दल सायली ईटाज व वेट लिफ्टिंग स्पर्धेत यश मिळविलेल्या भुमिका मोहिते यांचा तत्कार नामदार यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी संस्थेच्या व्हा.चेअरमन सुषमा उपाध्ये, संजय चौगुले, उपसरपंच विकास माळी, अक्षय आलासे, जवाहर पाटील, उमेश कर्नाळे, राजेंद्र खुरपे, शांतीनाथ पाटील, वृषभकुमार उपाध्ये , संदिप मस्के, बंडू उमडाले, जिनाप्पा भबिरे, माजी सभापती सुवर्णा अपराज, वसंतराव देसाई, रावसाहेब पाटील चिपरीकर, आण्णासाहेब चौगुले यांच्यासह मान्यवर, पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार राजेंद्र गजाण्णावर यांनी केले.
