Top News

श्री दत्त साखर कारखान्याच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आलेल्या शुगरबीट काढणीचा शुभारंभ


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आलेल्या शुगरबीट काढणीचा शुभारंभ करण्यात आला. श्री दत्तच्या संचालिका सौ. संगीता संजय पाटील- कोथळीकर यांच्या शेतामधील शुगरबीट मान्यवरांच्या उपस्थितीत काढण्यात आला. यावेळी श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडीत गणपतराव पाटील, कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील उपस्थित होते.

शिरोळ तालुका आणि परिसराला प्रत्येक वर्षी महापुराचा फटका बसत असल्याने मोठ्या प्रमाणावर ऊस पिकाचे नुकसान होत आहे. याचा फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसतो. हे नुकसान भरून काढण्याच्या उद्देशाने आणि यावर पर्यायी पीक शोधण्यासाठी दत्त कारखान्याने गेल्यावर्षी राज्यातील नामवंत शेतीतज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांचे चर्चासत्र आयोजित केले होते. या चर्चासत्रात उसाला पर्यायी पीक म्हणून शुगर बीटचा पर्याय समोर आला होता. त्यानुसार दत्तच्या ५० शेतकरी सभासदांच्या ५२ एकर क्षेत्रावर प्रायोगिक तत्त्वावर शुगरबीटची लावण करण्यात आली होती.

सौ. संगीता पाटील कोथळीकर यांच्या कोंडीग्रे हद्दीतील शेतामधील शुगरबीट काढण्याचा शुभारंभ उद्यानपंडीत गणपतराव पाटील, व्ही. एस. आय. चे सचिन कदम आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. एकरी ४० टन शुगरबीटचे उत्पादन येण्याचा अंदाज आहे.

  यावेळी बोलताना गणपतराव पाटील म्हणाले, महापुरामुळे ऊस उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी कोणते उपाय करता येईल या विचारातून शुगरबीटचे प्रायोगिक तत्त्वावर उत्पादन घेण्याचे ठरविण्यात आले. याला शेतकऱ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या हंगामामध्ये बीटा पासून साखरेचे उत्पादन, इथेनॉलचे उत्पादन तसेच इतर उपपदार्थांची निर्मिती कशा पद्धतीने करता येईल याचा सर्वांगाने विचार करण्यात येणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, उत्कृष्ट बियाणे, पाणी, खते, सेंद्रिय कर्ब आणि शेती व्यवस्थापन केल्यास एकरी साठ टनाच्या पुढे उत्पादन येऊ शकते. हा प्रयोग यशस्वी होणार याची खात्री असून आगामी काळात शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. पाच महिन्यांमध्ये शुगरबीटचे उत्पादन घेतल्यानंतर उरलेल्या हंगामात भाजीपाला व इतर पिकेही घेऊन शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होऊ शकते.

   यावेळी व्ही. एस. आय.चे कनिष्ठ शास्त्रज्ञ सचिन कदम, ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगान्ना, दिलीप पाटील कोथळीकर, ए. एस. पाटील, पत्रकार दयानंद लिपारे, राजकुमार चौगुले आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संजय पाटील कोथळीकर, माजी सरपंच संभाजीपूर सौ. सविता दिलीप पाटील कोथळीकर, सौ. यशोदा कोळी, ऊस पुरवठा अधिकारी अमर चौगुले, वर्क्स मॅनेजर संज्योत संकपाळ, चीफ केमिस्ट विश्वजित शिंदे, डिस्टलरी इंचार्ज यादव, सौरभ पाटील, रोहित पाटील, शकुंतला पाटील, शेती अधिकारी, मदतनीस, शेतकरी उपस्थित होते. या प्रयोगाला मोठे यश मिळत असल्याचे समोर येत आहे.

थोडे नवीन जरा जुने