हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
नव्या पाहुण्याच्या आगमनाची चाहूल लागताच घरात आनंदीआनंद असतो. सातव्या महिन्यात डोहाळे जेवण घातले जाते. यात लेक किंवा सुनेचे लाड केले जातात. हे चित्र सर्वत्रच पाहायला मिळतात; पण शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथे मात्र लाडक्या खिल्लार गायीचे डोहाळे जेवण उत्साहात घालण्यात आले. यावेळी पंचपक्वान्नाचा बेत केला होता.
गेल्या काही वर्षांपूर्वी शिरोळ तालुका परिसरात देशी गाईची संख्या प्रचंड कमी झाली होती. अलीकडच्या काही वर्षांत गाईचे महत्त्व पटू लागल्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांकडून देशी गाईचे संगोपन करण्यावर भर दिला जाऊ लागला आहे. त्यामुळे शिरोळ तालुका परिसरातील अनेक गावांमध्ये देशी व गीर गाईची संख्या वाढू लागली आहे.
हेरवाड येथील संजय माळी हे शेतकरी खिल्लार गाईसह म्हैशींचेही संगोपन करतात. त्यांचा मुलगा ओंकार माळी तसेच खिल्लार प्रेमी युवकांच्या संकल्पनेतून गाईच्या डोहाळे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गाईचे दूध लहान मुलांसह ज्येष्ठांसाठी अत्यंत गुणकारी असते. गाईला शेतकरी मातेचा दर्जा देतात. त्यामुळे गाईचे संगोपन करण्याचा निर्णय घेतल्याचे माळी यांनी स्पष्ट केले. लाडक्या गाईच्या डोहाळे कार्यक्रमानिमित्त माळी कुटूंबांनी गायीला फुलांच्या माळांनी सजविले होते. कार्यक्रमासाठी घराशेजारील महिला मोठ्या प्रमाणात जमल्या होत्या. गायीसाठी कळ्याचे लाडू, करंज्या, सजुऱ्या, तीन प्रकारचे पशुखाद्य डिश, केळीची फणी असे पंचपक्वान्न ठेवले होते. गाईच्या डोहाळे कार्यक्रमाचे कौतुक उपस्थित नागरिक करीत होते. या हटके कार्यक्रमाची चर्चा हेरवाड गावासह परिसरातील गावात व सोशल मीडियावर चांगलीच रंगली होती.